आमिरची गर्लफ्रेंड बनताना लाज नाही वाटली? पापाराझींवर भडकलेल्या गौरीला नेटकऱ्यांनी सुनावलं
अभिनेता आमिर खानची गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅट तिच्या एका व्हिडीओमुळे सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. या व्हिडीओमध्ये ती तिचा पाठलाग करणाऱ्या पापाराझींवर भडकल्याचं पहायला मिळतंय. कुठून येतात ही लोकं.. असं ती त्यांना म्हणतेय.

अभिनेता आमिर खानने त्याच्या 60 व्या वाढदिवशी गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅटसोबतचं रिलेशनशिप जगजाहीर केलं. त्यानंतर अर्थातच गौरीविषयी जोरदार चर्चा होऊ लागली. तिच्याविषयी जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक झाले. गौरीसोबत आमिर हातात हात घालून कार्यक्रमांमध्ये उपस्थित राहू लागला. त्यामुळे गौरीसुद्धा प्रकाशझोतात आली. परंतु अचानक मिळणारी ही प्रसिद्धी आणि पापाराझींकडून होणारा पाठलाग.. या गोष्टींची अद्याप तिला सवय नाही. या सर्व गोष्टी गौरीसाठी नवीनच असल्याने त्याला प्रतिक्रिया कशी द्यावी, याबाबत ती अनभिज्ञ आहे. म्हणूनच नुकतंच जेव्हा तिला पापाराझींनी पाहिलं आणि तिच्या अवतीभवती त्यांनी मोबाइल, कॅमेरे घेऊन घोळका केला, तेव्हा ती चिडली. राग अनावर झालेल्या गौरीने पापाराझींना सुनावलंही. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.
गौरी काही कामानिमित्त मुंबईतील वांद्रे इथं आली होती. यावेळी पापाराझींनी तिचा पाठलाग केला आणि फोटोसाठी तिच्याभोवती गराडा घातला. हे पाहून गौरी आधी गोंधळली आणि नंतर ती त्यांच्यावर चिडली. सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या या व्हिडीओमध्ये गौरी पापाराझींवर चिडल्याचं स्पष्टपणे पहायला मिळतंय. “कुठून येतात ही लोकं? तुम्ही माझा पाठलाग करताय का? मला एकटं सोडा”, असं ती पापाराझींना म्हणते. तेव्हा पापाराझींनी तिला फोटोसाठी विनंती केली. मात्र तीसुद्धा गौरीने नाकारली. गौरीच्या या व्हिडीओवरून काही नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलंय. ‘आमिरची गर्लफ्रेंड बनताना लाज नाही वाटली का? आता त्यांना बोलतेय की कुठून येतात. आमिरला विचारून बघ असा प्रश्न’, अशी टीका एकाने केली. तर ‘ती लोकं काही दुसऱ्या ग्रहावरून आलेली नाहीयेत. घरूनच येतात’, अशी उपरोधिक टीका दुसऱ्या युजरने केली.
View this post on Instagram
आमिर आणि त्याची गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅट हे सध्या लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत आहेत. आमिरचा दोन वेळा घटस्फोट झाला असून आपल्या साठाव्या वाढदिवशी त्याने गौरीसोबतचं नातं माध्यमांसमोर जाहीर केलं होतं. गौरीला सहा वर्षांचा मुलगासुद्धा आहे. आमिर आणि गौरीच्या वयात बरंच अंतर आहे. आमिर 60 वर्षांचा असून गौरी सध्या 46 वर्षांची आहे. म्हणजेच या दोघांमध्ये जवळपास 14 वर्षांचं आहे.
