‘सीआयडी’मध्ये एसीपी प्रद्युमन यांचा मृत्यू; भडकलेले चाहते म्हणाले ‘हा आमच्यावर अन्याय..’
सीआयडी ही लोकप्रिय मालिका 1998 मध्ये सुरू झाली आणि तेव्हापासून ही मालिका प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. ऑक्टोबर 2018 मध्ये या मालिकेचा पहिला सिझन सुरू झाला. त्यानंतर डिसेंबर 2024 मध्ये दुसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला आला. आतापर्यंत या मालिकेचे 1600 एपिसोड्स पूर्ण झाले आहेत.

‘सीआयडी’ ही छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय मालिका आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या मालिकेचं प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय. यातील प्रत्येक भूमिकेनं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. त्यापैकीच एक भूमिका म्हणजे एसीपी प्रद्युमन. परंतु आता हीच भूमिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं कळतंय. सोनी टीव्हीवर प्रसारित होणाऱ्या ‘सीआयडी’च्या नव्या एपिसोडमध्ये एसीपी प्रद्युमन यांचा बॉम्बस्फोटात मृत्यू झाल्याचं दाखवण्यात आलं आहे. शनिवारी रात्री हा एपिसोड प्रसारित झाला होता. तिग्मांशू धुलिया यांनी या एपिसोडमध्ये खलनायक बारबोझाची भूमिका साकारली आहे. त्याने केलेल्या बॉम्बस्फोटात एसीपी प्रद्युमन आपले प्राण गमावतात, असं त्यात दाखवण्यात आलं आहे.
या एपिसोडनंतर सोनी टीव्हीने त्यांच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. यामध्ये एसीपी प्रद्युमन यांचा फोटो होता. या फोटोसोबत त्यांनी लिहिलं, ‘एका युगाचा अंत.. एसीपी प्रद्युमन (1998- 2025). एसीपी प्रद्युमन यांच्या प्रेमळ आठवणीत.. कधीही विसरता येणार नाही असं नुकसान.’ ही पोस्ट वाचून प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. अनेकांनी त्यावर विविध प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.
‘माफ करा, पण एसीपी प्रद्युमन यांना ही श्रद्धांजली नाही, तर सीआयडी या मालिकेला आणि सोनी टीव्हीला आहे. कारण या निर्णयाने तुम्ही केवळ ती भूमिका संपवली नाही, तर तुम्ही एक वारसा पुरून टाकलात. लाखो लोकांच्या भावना तुम्ही उद्ध्वस्त केल्या आहात. एसीपी सर आमच्या हृदयात कायम राहतील. तुमचा आदर, तुमची विश्वासार्हता आणि निष्ठावंत चाहत्यांशी असलेलं तुमचं नातं आज खरोखरच संपलं आहे,’, असं एकाने लिहिलं. तर ‘सोनी टीव्ही, तुम्ही असं का केलात? तुम्ही एसीपी प्रद्युमन यांना का मारलात? ती फक्त भूमिका नव्हती, तो आमच्या आयुष्याचा एक भाग होता. गेल्या 25 वर्षांत ते गुन्हेगारीशी लढले, सन्मानाने जगले आणि आता तुम्ही त्यांची भूमिका अशा प्रकारे संपवत आहात? तुम्ही चाहत्यांना स्पष्टीकरण देण्यास बांधिल आहात’, असं दुसऱ्याने म्हटलंय.
‘गेल्या 27 वर्षांत इतके केसेस सोडवूनही त्यांना कधीच प्रमोशन मिळालं नाही. त्यांनी एसीपी म्हणून सुरुवात केली आणि त्यांचा मृत्यूदेखील एसीपीनेच झाला. सर्वोत्कृष्ट काम करूनही त्यांना कामात बढती मिळाली नाही’, अशी आश्चर्यकारक कमेंटही एका युजरने केली आहे. सीआयडीमधून बाहेर पडण्याबाबत अभिनेते शिवाजी साटम ‘बॉम्बे टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले, “मी काही काळासाठी ब्रेक घेतला आहे आणि निर्मात्यांना शो पुढे कसा न्यायचा हे माहीत आहे. मी सर्वकाही माझ्या मनाप्रमाणे घ्यायला शिकलो आहे. त्यामुळे मालिकेतील माझी भूमिका संपुष्टात आली तरी मला काही समस्या नाही. परंतु माझी भूमिका संपली आहे की नाही, हे मला अद्याप सांगण्यात आलेलं नाही. सध्यातरी मी मालिकेसाठी शूटिंग करतोय. “
