Ganesh Chaturthi : गणेश चतुर्थी, बाळासाहेब ठाकरे, नाना पाटेकर आणि धर्मेंद्र.. एकाच दिवशी तिघे एकत्र, काय घडलं त्या दिवशी ?
श्रीगणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर १९९४ मध्ये "अग्निसाक्षी" चित्रपटाचा मुहूर्त झाला. बिंदा ठाकरे यांनी हा मुहूर्त बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते घडवला. नाना पाटेकर यांनी आपल्या घरातील गणपती पूजनानंतरही वेळेवर मुहूर्ताला उपस्थित राहिले. धर्मेंद्र हे प्रमुख पाहुणे होते. मुहूर्ताचे छोटेसे दृश्य चित्रित झाले आणि नंतर नाना पाटेकर आपल्या घरच्या गणपती पूजनासाठी निघाले

श्रीगणेशोत्सव महाराष्ट्रातील सर्वात मोठा सण आहे. यावर्षीचा गणेशोत्सव सुरू होण्यास आता अवघे काहीच तास उरले असून घराघरांत जय्यत तयारी झाली आहे. गणरायाच्या आगमनासाठी सजावट, मखर, फुलांच्या माळा, आरास अशी छान सजावटीची तयारी, प्रसाद, पेढे, बाप्पाचे आवडते मोदक हेही घरोघरी तयार होतच आहेत. महाराष्ट्रात सर्वत्र, अनेक घरांत गणेशोत्सव उत्साहाने साजरा केला जातो. याच श्रीगणेश चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर नव्या गोष्टींची अतिशय श्रध्देने सुरुवात केली जाते. नवीन चित्रपटाच्या मुहूर्तासाठीही श्रीगणेश चतुर्थी उत्तम योग मानला जातो.
विशेष उल्लेखनीय गोष्ट, याच गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर एका अतिशय बहुचर्चित चित्रपटाचा मुहूर्त झाला होता. तो चित्रपट म्हणजे, बिंदा ठाकरे निर्मित व पार्थो घोष दिग्दर्शित ” अग्निसाक्षी “. आणि विशेष उल्लेखनीय गोष्ट हा मुहूर्त शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शुभ हस्ते झाला आणि धर्मेंद्र विशेष पाहुणा म्हणून उपस्थित होता. याच चित्रपटाच्या मुहूर्ताची एक विशेष गोष्ट, खास किस्सा प्रसिद्ध सिने समीक्षक दिलीप ठाकूर यांनी सांगितला आहे, चला वाचूया..
‘अग्निसाक्षी ‘चा शुभ मुहूर्त कसा झाला ?
बिंदा ठाकरे हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ज्येष्ठ पुत्र. आणि ते आपल्या चित्रपटाच्या मुहूर्तासाठी एकादा वैशिष्ट्यपूर्ण दिवस ठरवणार हे अगदी स्वाभाविक होतेच. त्यानुसार त्यांनी 1994 सालच्या श्रीगणेश चतुर्थीच्या दिवशी अंधेरीतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये दुपारी चार वाजता ‘अग्निसाक्षी ‘च्या शुभ मुहूर्ताचे आयोजन केले होते. दिवस तसा गडबडीचा, श्रीगणेशाचे पूजन करण्याचा. प्रश्न असा होता की, या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारणारा नाना पाटेकर , हा या दिवशीआपल्या माहिम येथील घराच्या गणपतीतून वेळ कसा काढणार? नाना पाटेकर आपल्या घरच्या गणपतीची नेहमी फुलांची आरस करतो. अनेक वर्ष तो हे करत आलेत. मात्र या चित्रपटाचा नायक जॅकी श्रॉफ नक्कीच येईल याची खात्री होतीच.
मुहूर्त होईपर्यंत या चित्रपटाची नायिका निश्चित झाली नव्हती. पण माधुरी दीक्षितचे नाव खूपच मोठ्या प्रमाणावर चर्चेत होते. तिच्याशी बोलणी झाल्याचीही बातमी होती. प्रत्यक्ष मुहूर्ताला नाना पाटेकर वेळेवर हजर राहिला. याचे कारण बहुधा बाळासाहेबांच्या हा मुहूर्त होणार असल्याने तो वेळेवर आला असावा. या मुहूर्तासाठी धर्मेंद्र प्रमुख पाहुणे म्हणून हजर होता.जुहूवरुन अंधेरी पूर्वेकडील या पंचतारांकित हॉटेलला यायला त्याला थोडासा उशीर झाला म्हणूनच की काय तो आला तोच भरभर चालत.
श्रीगणेश चतुर्थीचा दिवस असल्याने वातावरण अतिशय प्रसन्न होते. बाळासाहेबानीही हेच वातावरण असेच प्रसन्न ठेवले. मुहूर्त दृश्यात नाना पाटेकर आणि जॅकी श्रॉफने भाग घेतला. पार्थो घोषने मुहूर्तासाठी एका छोट्याशा दृश्याचे आयोजन केले होते. सगळे कसे आटोपशीर व्हावे असाच त्यांचा हेतू जाणवला. पण ते काही असले तरी मुहूर्तासाठीचा दिवस अगदी चांगला निवडला होता.
मुहूर्ताचे दृश्य ओके होताच नाना पाटेकरने आपल्या घरच्या गणपतीसाठी जायचयं असे म्हणतच निघणे पसंत केले. तेथून त्याला माहिम गाठायचे होते. अर्थात तोपर्यंत भरपूर फोटो निघणे आलेच. थोड्याच दिवसात मनिषा कोईरालाचीही या चित्रपटाची नायिका म्हणून निवड झाली आणि श्रीगणेशोत्सव संपल्यावर थेट मॉरिशसमध्ये पहिले चित्रीकरण सत्र सुरु झाले.. आणि चित्रपट पूर्ण झाल्यावर मुंबईत मेट्रो व अन्य चित्रपटगृहात ” अग्निसाक्षी ” प्रदर्शित झाला तोच फर्स्ट शोपासूनच सुपरहि ठरला. गणपती पावला म्हणायचे.
– दिलीप ठाकूर (लेखक ज्येष्ठ सिने समीक्षक आहेत.)
