अमिताभ बच्चन यांच्या बंगल्यालाही पावसाचा फटका; ‘प्रतीक्षा’ जलमग्न, पहा व्हिडीओ
मुंबईतील मुसळधार पावसाचा फटका सर्वसामान्यांसोबतच बॉलिवूड सेलिब्रिटींनाही बसला आहे. अमिताभ बच्चन यांच्या जुहू इथल्या बंगल्यासमोर पाणी साचलं आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हवामान विभागाने सोमवारपाठोपाठ मंगळवारीही वर्तवलेल्या इशाऱ्यानुसार पावसाने मुंबईत दमदार वर्षाव केला. मंगळवारी दिवसभर पाऊस सुरूच राहिल्याने ठिकठिकाणी पाणी साचलं होतं. दादर टीटी, ट्रॉम्बे, महाराष्ट्र नगर सबवे, अँटॉप हिल, एमजी आर चौक, कानेकर नगर, सरदार नगर, प्रतीक्षा नगर या भागात दीड ते दोन फुटांपर्यंत पाणी साचलं होतं. अशातच ता बॉलिवूडचे महानायक अर्थात अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या ‘प्रतीक्षा’ या बंगल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जुहू इथल्या त्यांच्या ‘प्रतीक्षा’ बंगल्याच्या परिसरातही पाणी साचल्याचं पहायला मिळतंय.
अमिताभ बच्चन यांच्या जुहू इथल्या ‘प्रतीक्षा’ बंगल्यासमोरील काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्ये बंगल्याबाहेर पाणी साचल्याचं दिसून येत आहे. बंगल्याच्या आत कम्पाऊंड परिसरातही पाणी साचलं आहे. एका तरुणाने त्यांच्या बंगल्याचा व्हिडीओ शूट करून सोशल मीडियावर अपलोड केला आहे. मुंबईच्या पावसापासून सेलिब्रिटीसुद्धा वाचू शकले नाहीत, असं तो या व्हिडीओत म्हणतोय. व्हिडीओ शूट करताना तो तरुण बंगल्याच्या सुरक्षारक्षकापर्यंत पोहोचतो, परंतु नंतर गार्ड लगेच गेट बंद करतात आणि त्या व्यक्तीला बाहेर जाण्यास सांगतात.
#AmitabhBachchan #MumbaiRains #viralvideo pic.twitter.com/ilP1ddf5bA
— Diksha Sharma (@DikshaS17150327) August 19, 2025
व्हिडीओमध्ये बिग बींच्या बंगल्याची अवस्था दाखवत तरुण म्हणतो, “बघा, इथे सर्वत्र पाणीच पाणी आहे. अमिताभ बच्चन स्वत:च पाणी काढण्यासाठी वायपर घेऊन बाहेर पडलेत की काय? तुमच्याकडे कितीही पैसे असले, कितीही हजार कोटी असले तरी मुंबईच्या पावसापासून कोणीही वाचू शकलेलं नाही.” अमिताभ बच्चन यांनी 1976 मध्ये जुहूमधील ‘प्रतीक्षा’ बंगला खरेदी केला होता. बिग बींचे वडील हरिवंश राय बच्चन यांनी या बंगल्याला ‘प्रतीक्षा’ असं नाव दिलं होतं. याच घरात मुलगी श्वेता आणि मुलगा अभिषेक यांचा जन्म झाला होता. नंतर बच्चन कुटुंबीय ‘जलसा’मध्ये राहायला गेले आणि आता बिग बींनी त्यांचा हा बंगला मुलगी श्वेताच्या नावावर केला आहे.
अमिताभ बच्चन यांच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास, ते सध्या ‘कौन बनेगा करोडपती 17’ या शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून बिग बी या शोचं सूत्रसंचालन करत आहेत.
