शाहरुख खानची कार्बन कॉपीच..; आर्यन खानचा आवाज ऐकून नेटकरी थक्क!
आर्यन खानच्या चित्रपटाचा प्रीव्ह्यू नुकताच लाँच झाला. यावेळी पहिल्यांदाच तो मंचावर उभं राहून प्रेक्षकांशी संवाद साधत होता. आर्यनचा आवाज ऐकून नेटकरीसुद्धा थक्क झाले आहेत. हुबेहूब शाहरुख खानच.. अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.

बॉलिवूडचा ‘किंग’ अर्थात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानने बॉलिवूड इंडस्ट्रीत पहिलं पाऊल ठेवलं आहे. परंतु आर्यन त्याच्या वडिलांप्रमाणे अभिनयातून नव्हे तर दिग्दर्शन क्षेत्रातून करिअरची सुरुवात करतोय. आर्यन खान दिग्दर्शित ‘बॅडास ऑफ बॉलिवूड’ (The Ba***ds Of Bollywood) या चित्रपटाचा प्रीव्ह्यू लाँच इव्हेंट नुकताच पार पडला. यावेळी आर्यनने पहिल्यांदाच मंचावर येऊन आपल्या भावना व्यक्त केल्या. आर्यनचा धीर वाढवण्यासाठी शाहरुखसुद्धा मंचावर उपस्थित होता. या कार्यक्रमातील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर नेटकऱ्यांकडून प्रतिक्रियांचा वर्षाव होत आहे.
शाहरुखनेच त्याच्या मुलाच्या कार्यक्रमाची ओपनिंग केली होती. त्यानंतर त्याने आर्यनला मंचावर बोलावलं. यावेळी आर्यनच्या चालण्याचा, बोलण्याचा, हसण्याचा अंदाज हा हुबेहूब शाहरुखसारखं असल्याचं पहायला मिळालं. इतकंच नव्हे तर आर्यनने जेव्हा बोलायला सुरुवात केली, तेव्हा त्याचा आवाजसुद्धा शाहरुखसारखाच ऐकायला मिळाला. आर्यन हा किंग खानचीच कार्बन कॉपी आहे, अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.
View this post on Instagram
मंचावर आल्यानंतर आर्यन म्हणाला, “माझ्या मनात खूप धाकधूक आहे, कारण मी पहिल्यांदा तुमच्यासमोर स्टेजवर आलोय. दोन-तीन दिवसांपासून मी सतत या भाषणाचा सराव करतोय. मी इतका नर्व्हस आहे की मी माझ्या भाषणाला टेलीप्रॉम्प्टरवरसुद्धा लिहून घेतलंय. जर लाइट गेली, तर त्यासाठी मी पेपर आणि टॉर्चसुद्धा आणलाय. त्यातही काही गडबड झाली, तर मग पापा (शाहरुख मंचावर पाठमोरा उभा राहतो आणि त्याच्या पाठीवर भाषणाचा कागद चिटकवलेला दिसतो) आहे ना. या सर्व गोष्टींनंतरही जर माझ्याकडून काही चुका झाल्या, तर मला माफ करा. कारण मी सर्व पहिल्यांदाच करतोय.”
या प्रोजेक्टसाठी चार वर्षांची कठोर मेहनत घेतल्याचं आर्यनने सांगितलं. “हजारो टेक घेतल्यानंतर अखेर हा शो तयार झाला आहे. मी त्या सर्वांचा आभारी आहे, ज्यांच्याशिवाय हा शो बनूच शकला नसता”, अशा शब्दांत तो आभार व्यक्त करतो. आर्यनचा हा शो नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. यामध्ये बॉबी देओल, राघव जुयाल, गौतमी कपूर, अन्या सिंह, लक्ष्य, विजयंत कोहली आणि मोना सिंह यांसारखे कलाकार आहेत. तर सलमान खान, रणवीर सिंह आणि करण जोहर हेसुद्धा प्रीव्ह्यूमध्ये झळकले आहेत.
