‘ये रिश्ता..’ फेम अभिनेत्याने बलात्काराच्या आरोपांवर अखेर सोडलं मौन; पुण्यातून झाली होती अटक
Ashish Kapoor : 'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता आशिष कपूरला बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. अखेर त्याला जामीन मिळाला असून पहिल्यांदाच त्याने या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.

दिल्लीतील एका ‘हाऊस पार्टी’दरम्यान एका महिलेवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेला अभिनेता आशिष कपूरला नुकताच कोर्टाने जामीन मंजूर केला. दिल्लीच्या तीस हजारी कोर्टाने बलात्कार प्रकरणात आशिषचा जामीन मंजूर केला. यानंतर त्याने पहिल्यांदाच या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक पोस्ट लिहित त्याने दिलासा व्यक्त केला आहे. आशिष हा टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेता आहे. दिल्लीत झालेल्या एका हाऊस पार्टीदरम्यान त्याने एका महिलेला बाथरुममध्ये नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे.
इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये आशिषने लिहिलं, ‘माझ्या मनात कृतज्ञतेची भावना आहे. या अनुभवातून मला आपल्या लोकशाहीची आणि आपल्या संविधानात समाविष्ट असलेल्या तत्त्वांची ताकद समजली. मला न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. या निकालामुळे माझा विश्वास आणखी दृढ झाला आहे. मला न्याय मिळवून देण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले आणि अखेर सत्य समोर आलं. सत्याचा नेहमीची विजय होईल याचा हा पुरावा आहे. या कठीण काळात ज्यांनी मला पाठिंबा दिला, त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. नागरिकांच्या हक्कांचं रक्षण करणाऱ्या व्यवस्थेचं मी कौतुक करतो.’
10 सप्टेंबर रोजी आशिषला 1 लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला. न्यायालयात वकिलांनी केलेला युक्तिवाद, सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुरावे पाहून आरोपीला तपासासाठी तुरुंगात ठेवणं आवश्यक नाही हे लक्षात घेऊन जामिनाचा निर्णय देण्यात आला. 6 सप्टेंबर रोजी पोलिसांच्या चौकशीनंतर आशिषला न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती.
नेमकं काय घडलं होतं?
पीडित महिला आणि आशिषची ओळख इन्स्टाग्रामवरूनच झाली होती. त्यानंतर त्याने तिला दिल्लीतील एका मित्राच्या घरी पार्टीला बोलावलं होतं. तिथेच वॉशरुममध्ये बलात्कार केल्याचा आरोप महिलेनं केला होता. आशिषने ड्रिंक्समध्ये काहीतरी मिसळल्याचाही आरोप पीडितेनं केला. इतकंच नव्हे तर याबाबत पोलिसांकडे तक्रार केली तर व्हिडीओ लीक करण्याचीही धमकी आशिषने दिल्याचा आरोप तिने केला होता.
आशिष कपूर हा टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याचा जन्म 17 ऑक्टोबर 1984 रोजी दिल्लीत झाला. त्याने ‘बंदिनी’, ‘सरस्वतीचंद्र’, ‘वो अपना सा’, ‘लव्ह मॅरेज’, ‘प्रतिज्ञा 2’, ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ यांसारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.
