‘बिग बॉस 19’ विजेत्याच्या पत्नीचा कधीच मूल जन्माला न घालण्याचा निर्णय; गौरव खन्ना स्पष्ट म्हणाला..
'बिग बॉस 19'चा विजेता गौरव खन्नाची पत्नी आकांक्षा चमोलाने कधीच मूल जन्माला न घालण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयावर गौरव नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मोकळेपणे व्यक्त झाला. पत्नीच्या या निर्णयाबद्दल गौरवचं काय मत आहे, जाणून घ्या..

प्रसिद्ध टीव्ही अभिनेता गौरव खन्नाने ‘बिग बॉस 19’चं विजेतेपद पटकावलं आहे. गौरवने आजवर अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. आपल्या कामासोबतच तो त्याच्या खासगी आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेत आला आहे. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर गौरव विविध मुलाखींमध्ये त्याच्या अनुभवाविषयी मोकळेपणे व्यक्त होत आहे. अशाच एका मुलाखतीत त्याला त्याच्या पत्नीच्या एका निर्णयाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. गौरवची पत्नी आकांक्षा चमोला हिने कधीच मूल जन्माला न घालण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयावर आता गौरवनेही रोखठोक प्रतिक्रिया दिली आहे.
‘न्यूज 18’शी बोलताना गौरव खन्ना स्पष्ट शब्दांत या गोष्टीचा स्वीकार केला की त्याला पत्नीच्या मूल जन्माला न घालण्याच्या निर्णयाशी कोणतीच समस्या नाही. इतकंच नव्हे तर गौरवने असंही सांगितलं की काहीही झालं तरी तो त्याच्या पत्नीच्या बाजूने खंबीरपणे उभा राहील. “आपण नेहमी असा का विचार करतो की फक्त आपल्या पत्नीनेच आपली साथ दिली पाहिजे? आपण पुरुष आहोत. आपण महिलांची अधिक साथ दिली पाहिजे. मला खूप आनंद आहे की यानिमित्ताने हा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे”, असं गौरव म्हणाला.
View this post on Instagram
याविषयी गौरवने पुढे स्पष्ट केलं, “जर माझी पत्नी एखाद्या गोष्टीसाठी तयार नसेल तर मीसुद्धा तयार नाही. म्हणूनच आम्हाला मूल नकोय. असं नाहीये की तिला नकोय आणि मी सहमत आहे. मी खूप खुश आहे. माझ्या पत्नीसाठी माझं प्रेम कोणत्याही दुसऱ्या पर्यायापेक्षा अधिक महत्त्वाचं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की जर आणखी 10-15 जणांनी जरी असा विचार केला तरी हे जग आणखी चांगलं होऊ शकतं.” गौरव खन्नाने याआधी बिग बॉसच्या घरातसुद्धा पत्नीच्या या निर्णयाविषयी वक्तव्य केलं होतं.
बिग बॉसच्या घरात गौरव जेव्हा या निर्णयाविषयी मोकळेपणे व्यक्त झाला, तेव्हा तो अत्यंत भावूक झाला होता. मुलांचा विषय सातत्याने मांडून तो सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करतोय, असा आरोप त्याच्यावर झाला होता. हे आरोप ऐकून गौरव बिग बॉसच्या घरात रडू लागला होता. यावेळी त्याने पत्नीविषयीचं त्याचं प्रेम व्यक्त केलं होतं.
