सुपरस्टारच्या करिअरमधील शेवटचा चित्रपट; बॉबी देओल विलन तर 3 ‘महारथीं’ची खास एण्ट्री
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील मोठ्या कलाकारांवर कोट्यवधींची गुंतवणूक करण्यात आली आहे. काही चित्रपटांवर सध्या काम सुरू आहे, तर काही लवकरच थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहेत. त्यापैकीच एक चित्रपट साऊथ सुपरस्टार थलपती विजयचा आहे. हा त्याच्या करिअरमधील शेवटचा चित्रपट असल्याने त्याची सर्वाधिक चर्चा होत आहे.

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता थलपती विजयच्या करिअरमधील शेवटच्या चित्रपटाची प्रेक्षकांना प्रचंड उत्सुकता आहे. या चित्रपटाचं नाव आहे ‘जन नायगन’. या चित्रपटानंतर विजय चित्रपटसृष्टीला पूर्णपणे रामराम करणार असून राजकारणावर लक्ष केंद्रीत करणार आहे. इतक्या मोठ्या सुपरस्टारचा शेवटचा चित्रपट असल्याने त्यावर निर्मातेसुद्धा कोट्यवधी रुपये खर्च करायला तयार आहेत. यामध्ये विजयसोबतच इतरही मोठमोठ्या कलाकारांच्या भूमिका असल्याचं कळतंय. विशेष म्हणजे थलपती विजयसमोर खलनायक म्हणून बॉलिवूड अभिनेता बॉबी देओल उभा ठाकणार आहे. त्याचसोबत आणखी तीन मोठ्या कलाकारांची नावं समोर आली आहेत.
हा चित्रपट 9 जानेवारी 2026 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. एच. विनोद या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत. ‘वलई पेचू’ने दिलेल्या वृत्तानुसार निर्मात्यांनी विजयच्या या अखेरच्या चित्रपटासाठी मोठी प्लॅनिंग केली आहे. यासाठी एक-दोन नव्हे तर तीन दिग्दर्शक एकत्र येत आहेत. परंतु यातही एक ट्विस्ट आहे. हे तिघे दिग्दर्शक मिळून या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार नाहीत. तर त्यात अभिनय करणार आहेत.
#JanaNayagan pic.twitter.com/cs51UDEi1Q
— Vijay (@actorvijay) January 26, 2025
नव्या रिपोर्टनुसार, थलपती विजयच्या या चित्रपटात लोकेश कनगराज, नेल्सन दिलीप कुमार आणि अटली हे तिघे दिग्दर्शक पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकणार आहेत. चित्रपटात ते पत्रकारांची भूमिका साकारणार आहेत. यामागचं कारण म्हणजे या सर्व दिग्दर्शकांचे विजयसोबत खूप चांगले संबंध आहेत आणि त्याने या तिघांसोबत काम केलंय. लोकेशसोबत त्याने ‘मास्टर’ आणि ‘लियो’मध्ये काम केलंय. या दोन्ही चित्रपटांनी जगभरात अनुक्रमे 223 आणि 605.9 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. तर नेल्सन दिलीपकुमार सोबत त्याने ‘बीस्ट’मध्ये काम केलं होतं. या चित्रपटानेही 252.75 कोटी रुपये कमावले होते. पाचही चित्रपट मिळून तब्बल 1500 कोटी रुपयांचा व्यवसाय झाला होता. या तीन दिग्दर्शकांसोबतच संगीतकार अनिरुद्ध रविचंदरसुद्धा एका खास गाण्यात झळकणार असल्याचं कळतंय. अनिरुद्धनेच या चित्रपटाच्या संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे
‘जन नायगन’ या चित्रपटात थलपती विजय एका पोलिसाची भूमिका साकारणार आहे. यात त्याच्यासोबत बॉबी देओल आणि पूजा हेगडे यांच्याही भूमिका आहेत. मोठ्या पडद्यावर थलपती विजय आणि बॉबी देओल यांना एकत्र पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
