सेटवर शूटींग करताना हृदयविकाराचा झटका, प्रसिद्ध कॉमेडी अभिनेत्याचा मृत्यू
प्रसिद्ध कॉमेडी अभिनेता राजू तालिकोटेचे निधन झाले आहे. सेटवर शूटिंगदरम्यान हृदयविकाराचा झटका आल्यामुळे अभिनेत्याचा मृत्यू झाला आहे. त्याच्या निधनामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे.

सोमवार हा दिवस साऊथ फिल्म इंडस्ट्रीसाठी अतिशय वाईट ठरला. आपल्या विनोदी शैलीने प्रेक्षकांना खळखळून हसायला भाग पाडणारा विनोदी अभिनेते राजू तालिकोटे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. ६२ वर्षीय राजू आपल्या अपकमिंग चित्रपटाच्या शूटिंग सेटवर होते आणि सीन संपवताच त्यांना अचानक हार्ट अटॅक आला. त्यानंतर तातडीने अभिनेत्याला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
राजू तालिकोटे हे कन्नड चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते होते आणि त्यांनी केजीएफ चित्रपटातील रॉकिंग स्टार यशसोबत ‘राजधानी’ या चित्रपटातही काम केले होते. राजू तालिकोटे यांच्या मृत्यूची बातमी समोर येताच कन्नड चित्रपटजगतात शोककळा पसरली. प्रत्येकजण या दिग्गज अभिनेत्याच्या निधनावर शोक व्यक्त करत आहे. त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
वाचा: साराच्या बर्थडेच्या दिवशी सानियाने असं काही केलं की… अर्जुनही झाला आवाक!
सोमवारी कर्नाटकातील उदुपी जिल्ह्यात राजू हे सुपरस्टार शाइन शेट्टीसोबत आपल्या आगामी चित्रपटाचे शूटिंग करत होते. दोन दिवसांपासून ते सतत काम करत होते आणि १३ ऑक्टोबरला अचानक त्यांची तब्येत खराब झाली. हे पाहून त्यांना उदुपीच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांच्या प्रयत्नांना अपयश आले. डॉक्टरांच्या टीमने सांगितले की, त्यांना यापूर्वी दोन वेळा हार्ट अटॅक आला होता आणि हा तिसरा झटका ठरला, ज्याने त्यांची प्राणज्योत मालवली.
राजू तालिकोटे यांचे लोकप्रिय चित्रपट
सुमारे दोन दशकांहून अधिक काळ राजू तालिकोटे हे फिल्म इंडस्ट्रीमध्ये सक्रिय होते. या काळात त्यांनी कन्नड सिनेमात २० पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केले. ते साइड रोलमध्ये कॉमेडियनची भूमिका साकारायचे. त्यांच्या लोकप्रिय चित्रपटांमध्ये पंजाबी हाऊस, जैकी, सुग्रीवा, राजधानी, अलमारी, टोपिवाला, वीर या चित्रपटांचा समावेश आहे.
