दीपिका पादुकोण – फराह खानने इन्स्टाग्रामवर एकमेकींना केलं अनफॉलो; कारण आलं समोर
अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि कोरिओग्राफर फराह खान यांच्यातील शीतयुद्ध आता समोर आलं आहे. कारण या दोघींनी इन्स्टाग्रामवर एकमेकींना अनफॉलो केलंय. दीपिकाने आठ तासांच्या शिफ्टची मागणी केली होती. त्यावरून फराहने तिची खिल्ली उडवली होती.

अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि कोरिओग्राफर-दिग्दर्शक फराह खान यांनी इन्स्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केलंय. त्यामुळे या दोघींमध्ये काही वाद झाल्याची जोरदार चर्चा आहे. फराह खानच्या ‘ओम शांती ओम’ या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. तेव्हापासून या दोघींमध्ये चांगली मैत्री होती. परंतु आता इन्स्टाग्रामवर दोघींनी एकमेकांना अनफॉलो केल्याने नेटकरी संभ्रमात पडले आहेत. या दोघींमध्ये नेमकं काय बिनसलं, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. फराह आणि दीपिका यांनी एकमेकांना अशा वेळी अनफॉलो केलं, जेव्हा 8 तासांच्या कामाचा मुद्दा चर्चेत होता. दीपिकाने इंडस्ट्रीत 8 तासांच्या शिफ्टची मागणी केली होती. यादरम्यान फराहने फक्त दीपिकालाच नाही तर तिचा पती आणि अभिनेता रणवीर सिंहलाही अनफॉलो केलंय. परंतु रणवीर अजूनही फराहला इन्स्टाग्रामवर फॉलो करतोय.
दीपिका पादुकोणच्या 8 तासांच्या शिफ्टच्या मागणीवर फराह खानने टिप्पणी केली होती. आपल्या युट्यूब व्लॉगमध्ये तिने अभिनेत्री राधिका मदनला तिच्या पहिल्या ऑडिशनबद्दल विचारलं होतं. “मला असं वाटतं की तुझी शिफ्ट 8 तासांची नव्हती?” त्यावर राधिका सांगते, “56 तास नॉन-स्टॉप आणि 48 तास न थांबता.” त्यानंतर फराह खान स्पष्ट करते की ती 8 तासांच्या शिफ्टला पाठिंबा देत नाही. “आगीत तळपूनच सोनं चमकतं”, असं ती राधिकाला म्हणते.

आणखी एका व्लॉगमध्ये जेव्हा फराह खानला विचारलं जातं की दीपिका पादुकोण कधी येणार? तेव्हा फराह मस्करी करत म्हणते, “ती फक्त 8 तासांचं शूटिंग करते. तिच्याकडे व्लॉगसाठी वेळ नाही.” फराहने दीपिकाला हा टोमणा मारल्याची चर्चा झाली होती. यावरूनच दोघींमध्ये मतभेद निर्माण झाल्याचं म्हटलं जात आहे.
गेल्या काही महिन्यांत दीपिकाच्या हातातून दोन मोठ्या चित्रपटांचे प्रोजेक्ट्स गेले आहेत. ‘कल्की’ या सुपरहिट चित्रपटाच्या दुसऱ्या भागातून दीपिकाला काढून टाकण्यात आलं. तर त्याआधी तिने संदीप रेड्डी वांगाच्या ‘स्पिरीट’मधून माघार घेतली होती. दीपिकाने कामाचे तास कमी आणि मानधन अधिक मागितल्याची त्यावेळी चर्चा होती. प्रभासची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटासाठी दीपिकाने वीस दिवस शूटिंगसुद्धा केलं होतं. परंतु दीपिकाची 25 टक्के फी वाढवण्याची मागणी अमान्य असल्याने दुसऱ्या अभिनेत्रीला घ्यावं लागल्याचं निर्मात्यांनी स्पष्ट केलं होतं.
