बायका माझ्याबद्दल आईला बरंवाईट..; ‘देवमाणूस’ फेम किरण गायकवाडची मोठी खंत
'देवमाणूस' या मालिकेत नकारात्मक भूमिका साकारणाऱ्या किरण गायकवाडच्या आईला त्यांच्या मुलाबद्दल वाईट गोष्टी ऐकायला मिळायच्या. याबद्दल अभिनेता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मोकळेपणे व्यक्त झाला.

काही कलाकार असे असतात, जे त्यांच्या भूमिकेत अक्षरश: जिवंतपणा आणतात. म्हणूनच प्रेक्षकांकडून त्या भूमिकांना दमदार प्रतिसाद मिळतो. परंतु जेव्हा भूमिका नकारात्मक असते, तेव्हा त्या कलाकारांना प्रेक्षकांच्या टीकेलाही सामोरं जावं लागतं. अर्थातच ही त्यांच्या कामाची खरी पोचपावती असते. परंतु त्यामुळे येणाऱ्या नकारात्मक टिप्पणीकडेही सकारात्मकतेने बघावं लागतं. असंच काहीसं अभिनेता किरण गायकवाडसोबत घडलंय. ‘देवमाणूस’ या मालिकेतून किरणने त्याच्या दमदार अभिनयकौशल्याची छाप प्रेक्षकांच्या मनावर सोडली. या मालिकेचे पहिले दोन सिझन तुफान गाजले आणि आता तिसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या तिन्ही सिझनमध्ये किरणने नकारात्मक भूमिका साकारली आहे. ही भूमिका त्याने इतक्या दमदार पद्धतीने साकारली आहे, की त्यामुळे कधी कधी त्याला लोकांचा तिरस्कारही सहन करावा लागतो. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने याविषयीचा अनुभव सांगितला.
‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत किरण म्हणाला, “मी लागिरं झालं जी या मालिकेत काम करेपर्यंत माझी आई धुणी-भांडी करत होती. त्यानंतर मीच तिला म्हटलं की, आता तू हे काम करू नकोस. माझ्याने जितकं शक्य होईल, ते सर्व मी तुझ्या पायाशी आणून देईन, असं तिला सांगितलं. त्यानंतर तिने धुणीभांडीचं काम सोडलं. आता तिला माझा खूप अभिमान वाटतो. देवमाणूस मालिकेतील माझी नकारात्मक भूमिका लोकांना आवडत नाही. त्यामुळे काही बायका माझ्या आईला भेटल्या की त्या मला शिव्या द्यायच्या. अर्थातच तिला वाईट वाटायचं. याबद्दल सांगताना ती एकदा माझ्यासमोर रडली होती. असलं काम नको करू, असं ती मला बोलू लागली. त्या गोष्टीचं मला आजही खूप वाईट वाटतं.” याच कारणामुळे किरणने आजवर त्याच्या आईला त्याच्या मालिकेच्या सेटवर घेऊन गेला नाही. कारण जेव्हा भूमिका सकारात्मक असेल, त्यादिवशी आईला सेटवर घेऊन जाईन, असा निर्धार त्याने केला आहे.
View this post on Instagram
‘देवमाणूस- मधला अध्याय’ या मालिकेची कथा ही पहिल्या आणि दुसऱ्या सिझनच्या मधली आहे. डॉक्टर अजितकुमार देव कातळवाडीतून निघून जातो. तो परत आल्यानंतर त्याला फाशी होते. परंतु यादरम्यान तो कुठे होता, काय करत होता, तिथेही तो कसा पोहोचला, त्याने कुणाला फसवलं, माणसांच्या विश्वासाचा कसा गैरफायदा घेतला.. हे सगळं प्रेक्षकांना ‘देवमाणूस- मधला अध्याय’ या मालिकेत बघायला मिळत आहे. या पर्वात किरण हा गोपाळची भूमिका साकारत आहे.
