Akshaye Khanna : तो कधीच.. ‘धुरंधर’च्या जमील जमालीचा अक्षय खन्नाबद्दल मोठा खुलासा !
धुरंधर चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. विशेषत: अक्षय खन्नाच्या कामाचा खूप बोलबाला आहे. त्याच रेहमान डकैत सगळीकडे हिट ठरला असून अनेक जण त्याच्या कामाने प्रभावित झाले आहेत. मात्र धुरंधरमधील अक्षयचा को-स्टार, जमील जमालीचा रोल करणारे अभिनेते राकेश बेदी यांनी त्याच्याबाबत जे सांगितलं..

गेल्या महिन्यात रिलीज झालेल्या ‘धुरंधर’ने (Dhurandhar) बॉक्स ऑफीसवर तर आग लावली आहेच. पण या चित्रपटातील कलाकारांचंही खूप कौतुक होतंय. विशेषत: अक्षय खन्नाचा (Akshaye Khanna) रेहमान डकैत सतत चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. त्याचा स्वॅग, त्याचा डान्स आणि अभिनय.. सगळीकडे त्याचीच चर्चा आहे. त्याच्या डान्सचे व्हिडीओही वेगाने व्हायरल होत आहेत. काही लोकांनी तर हा अक्षय खन्नाचा जोरदार कमबॅक असल्याचे म्हटले आहे. याच दरम्यान आता या चित्रपटात जमील जमालीची भूमिका साकारणारे अभिनेते राकेश बेदी यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
अक्षय खन्नाच्या कमबॅक बद्दल काय म्हणाले राकेश बेदी ?
धुरंधरमधून अक्षय खन्नाने कमबॅक केलंय याबद्दल राकेश बेदी समहत नाहीत. एका मुलाखती दरम्यान त्यांनी यावर प्रतिक्रिया दिली. ‘अक्षय खन्ना नेहमीच रेसमध्ये होता, तो कधीच गेममधून बाहेर गेला नव्हता. त्याचे आणि आमचेही चित्रपट येत असतात, एखादा चित्रपट जास्त चालोत, एखादा कमी चालतो. पण याचा अर्थ तो इंडस्ट्रीबाहेर होता, गेमममध्ये नव्हता असं नाही’, असं राकेश बेदी म्हणाले.
याशिवाय राकेश बेदी हे धुरंधरच्या यशाबद्दल बोलले. “हे आयुष्यात एकदाच मिळणारे यश आहे. आता ते पहा, ते बाहुबलीसारखे आहे. खूप प्रयत्न केले, पण प्रभासच्या बाबतीत पुन्हा कधीच असे घडले नाही. प्रत्येक अभिनेता आणि दिग्दर्शक त्यांच्या कारकिर्दीत अशाच एका अनपेक्षित घटनेची वाट पाहत असतो आणि काही लोकांना त्यांच्या आयुष्यात कधीच ते मिळत नाही.” असं ते म्हणाले.
धुरंधरचं बॉक्स ऑफिस कलेक्शन
5 डिसेंबरला प्रदर्शित झालेल्या धुरंधर या चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य धर यांनी केले आहे. रणवीर सिंग मुख्य भूमिकेत आहे, तर अक्षय खन्ना, आर. माधवन, अर्जुन रामपाल, संजय दत्त आणि सारा अर्जुन यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. प्रत्येकानेच आपलं काम चोख केलं आहे. अक्षय खन्ना तर त्याच्या कामामुळे खूपच लोकप्रिय झाला. त्याने या चित्रपटात रेहमान डकैतची भूमिका साकारली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालताना दिसत आहे.रिलीज झाल्यानंतर एक महिना उलटूनही चित्रपटाची उल्लेखनीय कमाई सुरू आहे. या चित्रपटाने जगभरात 1100 कोटीपेक्षा जास्त कमाई केली आहे.
