Govinda Divorce: गोविंदाच्या घटस्फोटावर बहिणीने सोडलं मौन; वहिनी सुनिताबद्दल स्पष्टच म्हणाली..
अभिनेते गोविंदा आणि सुनिता अहुजा यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलं आहे. सुनिताने गोविंदाविरोधात कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज केल्याचं वृत्त आहे. आता या प्रकरणी गोविंदाच्या बहिणीने प्रतिक्रिया दिली आहे.

एकेकाळी बॉलिवूड गाजवणारा अभिनेता गोविंदा गेल्या काही महिन्यांपासून त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. पत्नीपासून वेगळं राहत असल्याच्या चर्चा असतानाच आता सुनिता अहुजाने कोर्टात त्याच्याविरोधात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केल्याचं वृत्त समोर आलं. याप्रकरणी गोविंदाची बहीण कामिनी खन्नाने मौन सोडलं आहे. या सर्व जुन्या गोष्टी असल्याचं म्हणत कुटुंबात सर्वकाही ठीक असल्याचं तिने स्पष्ट केलं आहे. भाऊ गोविंदा आणि वहिनी सुनिता यांच्या नात्यात कोणतीच कटुता नसल्याचं तिने सांगितलं आहे. गोविंदा आणि सुनिताने 1987 मध्ये लग्न केलं होतं. या दोघांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे.
काय म्हणाली गोविंदाची बहीण?
‘अमर उजाला’ला दिलेल्या मुलाखतीत गोविंदाची बहीण कामिनी म्हणाली, “कुटुंबात मतभेद असणं ही काही फार मोठी गोष्ट नाही. गोविंदा माझ्या मुलासारखा आहे. लहानपणापासूनच आम्ही त्याला खूप प्रेम दिलंय. मी आजसुद्धा त्याला तसंच पाहते. प्रत्येक घरात कधी ना कधी थोडीफार भांडणं होतातच. हा आपल्या आयुष्याचा भाग आहे. परंतु आपण हे विसरू नये की पती-पत्नीमधील नातं सर्वांत खास असतं. यात दोघंही एकमेकांना समजून समस्यांचं समाधान शोधून घेतील. मला पूर्ण विश्वास आहे की गोविंदा आणि सुनिता वहिनी त्यांच्या नात्याला सांभाळून घेतील.”
“नात्यांच्या बाबतीत नेहमी बाहेरच्यांचा हस्तक्षेप कमीत कमी असावा, असं माझं स्पष्ट मत आहे. सल्ल्यांबद्दल सांगायचं झालं तर आम्ही भाऊ-बहीण नेहमीच एकमेकांचा सल्ला विचारत असतो. परंतु गोविंदा आणि सुनिता दोघंही त्यांच्या नात्याबद्दल इतके समजुतदार आहेत की त्यांना कोणत्याही बाहेरच्या व्यक्तीच्या मार्गदर्शनाची गरज नाही. त्यांनी मुलांच्याही जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. मुलगा-मुलगी दोघंही मोठे झाले आहेत आणि स्वत:चं आयुष्य सांभाळत आहेत. अशात दोघं मिळून त्यांच्या मुद्द्यांवर मार्ग काढतील, असा मला विश्वास आहे. एक बहीण म्हणून माझं प्रेम आणि माझा आशीर्वाद नेहमीच त्यांच्यासोबत असेल”, अशी प्रतिक्रिया कामिनीने दिली.
गोविंदाच्या मॅनेजरची प्रतिक्रिया
याआधी गोविंदाचा मॅनेजर शशी सिन्हानेही घटस्फोटाच्या चर्चांवर मौन सोडलं होतं. “सध्या ज्या चर्चा होत आहेत, त्या जुन्या घटनांवरून होत आहेत. आता दोघांमध्येही सर्वकाही ठीक आहे. गोविंदा यांचं घर आणि ऑफिस जवळपासच आहे, त्यामुळे ते दोघं वेगवेगळे राहत आहेत, असं म्हणणंच चुकीचं आहे. वास्तव हेच आहे की आता दोघं सोबतच आहेत आणि पहिल्यासारखंच आपलं आयुष्य जगत आहेत. घटस्फोटाच्या चर्चा जुन्या आहेत आणि आता पुन्हा त्याच त्याच गोष्टी चघळल्या जात आहेत”, असं मॅनेजरने स्पष्ट केलं होतं.
