घटस्फोटाच्या 3 वर्षांनंतर अभिनेत्याला पूर्व पत्नीवर प्रेम; पुन्हा करणार लग्न?
लग्नाच्या आठ वर्षांनंतर गुलशन देवैयाने पत्नी कल्लिरोईला घटस्फोट दिला. परंतु घटस्फोटानंतर लगेच तीन वर्षांनी हे दोघं एकमेकांजवळ आले. गुलशन त्याच्या पूर्व पत्नीला पुन्हा डेट करू लागला आहे. हे दोघं पुन्हा लग्न करणार असल्याच्या चर्चेला उधाण आलंय.

अभिनेता गुलशन देवैयाने ‘गोलियों की रासलीला- रामलीला’, ‘दहाड’, ‘शैतान’, ‘बधाई दो’ यांसारख्या चित्रपटांमधून आपल्या दमदार अभिनयकौशल्याची छाप सोडली. चित्रपटांसोबतच तो त्याच्या खासगी आयुष्यामुळेही सतत चर्चेत असतो. गुलशनने लग्नाच्या आठ वर्षांनंतर पत्नी कल्लिरोईला घटस्फोट दिला होता. कल्लिरोई ही परदेशी असल्याने या दोघांमध्ये सांस्कृतिक फरक होता. परंतु घटस्फोटानंतर गुलशनला याची जाणीव झाली की त्याला तिच्यापेक्षा चांगली जोडीदार भेटू शकत नाही. त्यामुळे हे दोघं पुन्हा एकमेकांना डेट करू लागले. आपल्या पूर्व पत्नीच्या वाढदिवसानिमित्त त्याने सोशल मीडियावर खास पोस्ट लिहित भावना व्यक्त केल्या आहेत. गुलशनची ही पोस्ट सध्या नेटकऱ्यांमध्ये चर्चेत आहे.
कल्लिरोईसोबतचे खास फोटो पोस्ट करत गुलशनने कॅप्शनमध्ये लिहिलं, ‘माझ्या प्रेमाला आणि माझ्या सर्वोत्कृष्ट मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा. इथून पुढे आपला पुढचा प्रवास कसा असेल याबद्दल मी खूप उत्सुक आहे.’ गुलशनच्या या कॅप्शनमुळे या दोघांच्या लग्नाची पुन्हा एकदा चर्चा होऊ लागली आहे. 2012 मध्ये या दोघांनी लग्न केलं होतं. लग्नाच्या आठ वर्षांनंतर 2020 मध्ये घटस्फोट घेतला. घटस्फोटाच्या तीन वर्षांनंतर हे दोघं पुन्हा एकमेकांना डेट करू लागले. 2023 मध्ये गुलशनने पूर्व पत्नीसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचं जाहीर केलं होतं. इतकंच नव्हे तर या नात्याकडे एका वेगळ्या दृष्टीकोनातून पाहत असल्याचं त्याने स्पष्ट केलं होतं.
View this post on Instagram
गेल्या वर्षी ‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत गुलशन म्हणाला होता की, पत्नीपासून विभक्त झाल्यानंतर त्याला अडथळ्यांना चांगल्या प्रकारे कसं तोंड द्यायचं हे शिकायला मिळालं. “आम्ही दोघं एकमेकांवर खूप प्रेम करतो आणि अजूनही आमच्यात दृढ नातं आहे. हे नातं कायम अबाधित असेल. परिस्थितीमुळे आम्ही सुरुवातीला ते टिकवू शकलो नव्हतो. परंतु आता आमची परिस्थिती एकसारखी नाही. आम्हीसुद्धा एकसारखे नाही आहोत. आम्ही दोघं वैयक्तिकरित्या प्रगती करतोय. त्यासाठी कदाचित विभक्त होणं महत्त्वाचं होतं”, असं त्याने सांगितलं होतं.
विभक्त होऊन पुन्हा एकत्र आल्यानंतर गुलशन आणि कल्लिरोई यांनी त्यांच्या नात्याला एका वेगळ्या दृष्टीकोनातून पाहत असल्याचं स्पष्ट केलं. “आम्ही पुन्हा एकमेकांना डेट करत आहोत. परंतु कोणत्याही गोष्टीचा अतिरेक त्यात होऊ नये याची पुरेपूर काळजी घेतोय”, असंही गुलशन म्हणाला. कल्लिरोई ही मूळची ग्रीसची असून तिने ‘मेड इन हेवन’ या गाजलेल्या वेब सीरिजच्या दुसऱ्या सिझनमध्ये एल्मिराची भूमिका साकारली होती.
