राखी त्यालाच बांधा जो शेवटच्या श्वासापर्यंत..; शेफालीच्या आठवणीत ‘हिंदुस्तानी भाऊ’ भावूक
'हिंदुस्तानी भाऊ'ने रक्षाबंधननिमित्त खास फोटो पोस्ट करत भावना व्यक्त केल्या आहेत. अभिनेत्री शेफाली जरीवाला त्याला दरवर्षी रक्षाबंधनिमित्त राखी बांधायची. जून महिन्यात तिने या जगाचा निरोप घेतला.

अभिनेत्री शेफाली जरीवालाच्या निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला होता. ‘कांटा लगा’ या रिमिक्स गाण्यामुळे प्रसिद्धीझोतात आलेल्या शेफालीचं जून महिन्यात निधन झालं. वयाच्या 42 व्या वर्षी तिने अखेरचा श्वास घेतला. आता रक्षाबंधननिमित्त शेफालीच्या आठवणीत ‘हिंदुस्तानी भाऊ’ उर्फ विकास पाठक भावूक झाला होता. सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत त्याने भावना व्यक्त केल्या आहेत. विकासला शेफाली भाऊ मानायची आणि दरवर्षी रक्षाबंधननिमित्त ती त्याला राखी बांधायची. ‘बिग बॉस 13’मध्ये दोघांनी एकत्र सहभाग घेतला होता. तेव्हापासून त्यांच्यात भाऊ-बहिणीचं नातं निर्माण झालं होतं. घरातून बाहेर पडल्यानंतर ती दरवर्षी त्याला आवर्जून राखी बांधायची. परंतु आता राखी बांधायला शेफाली या जगात नसल्याने ‘हिंदुस्तानी भाऊ’चं मन भरून आलं होतं.
‘हिंदुस्तानी भाऊ’ने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला असून त्यात शेफालीसोबतचा त्याचा एक फोटो पहायला मिळतोय. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्याने रडतानाच्या इमोजीसोबत लिहिलंय, ‘रक्षाबंधनच्या शुभेच्छा बेटा. आज मी स्वत:च तुझ्या नावाची राखी बांधली आहे.’ त्याच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून प्रतिक्रियांचा वर्षाव होतोय. याशिवाय शेफालीचा पती पराग त्यागीने त्यांच्या पाळीव श्वानाला राखी बांधली आहे. त्यांच्या पाळीव श्वानाचं नाव सिम्बा असून शेफाली त्याचा पोटच्या मुलासारखं सांभाळ करायची.
View this post on Instagram
परागनेही सोशल मीडियावर यासंदर्भातील व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तो सिम्बा आणि घरकाम करणाऱ्या व्यक्तीला शेफालीच्या नावाने राखी बांधताना दिसतोय. ‘परी, तू आपल्या सिम्बा आणि रामला राखी बांधायची. माझ्याकडून तू हे काम करवून घे जा, अशी माझी इच्छा आहे. म्हणूनच मी आज तुझ्यातर्फे सिम्बा आणि रामला राखी बांधली आहे. माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी तुझ्यावर प्रेम करत राहीन’, अशा शब्दांत त्याने भावना व्यक्त केल्या आहेत.
शेफाली अंधेरीच्या लोखंडवाला संकुलात पती पराग त्यागीसह राहत होती. 27 जून रोजी तिला हृदयविकाराचा झटका आला होता. उपचारासाठी शेफालीला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु रुग्णालयाने तिला मृत घोषित केलं होतं.
