दुसरं लग्न, धर्म परिवर्तन..; हुमा कुरेशीच्या हत्या झालेल्या भावाची स्टोरी काय?
दिल्लीत अभिनेत्री हुमा कुरेशीचा चुलत भाऊ आसिफ कुरेशीची हत्या करण्यात आली. दोन तरुणांनी मिळून क्षुल्लक वादातून त्याची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. आसिफने 2018 मध्ये दुसरं लग्न केलं होतं. त्याच्या वैयक्तिक आयुष्याविषयी जाणून घ्या..

अभिनेत्री हुमा कुरेशीचा चुलत भाऊ आसिफ कुरेशीच्या हत्येच्या घटनेनं खळबळ उडाली आहे. दिल्लीतील निजामुद्दीन स्टेशनजवळ दोन तरुणांनी त्याची हत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून त्यांचं वय 18 आणि 19 वर्षे आहे. उज्ज्वल आणि गौतम अशी आरोपींची नावं असून हे दोघं आसिफच्या घराच्या शेजारी राहणारे होते. पार्किंगच्या क्षुल्लक वादातून त्यांनी ही हत्या केल्याचं समोर आलं आहे. हुमाचा भाऊ आसिफ दिल्लीतील निजामुद्दीन इथं त्याच्या कुटुंबीयांसोबत राहात होता. त्याच्या पत्नीचं नाव साइनाज कुरेशी आहे. साइनाजचं मूळ नाव रेणुका जॉन होतं आणि ती ख्रिश्चन धर्माची होती.
आसिफ कुरेशीचं हे दुसरं लग्न होतं. 2018 मध्ये आसिफशी लग्न केल्यानंतर रेणुकाने धर्मपरिवर्तन केलं होतं. मुस्लीम धर्म स्वीकारत तिने तिचं नाव साइनाज कुरेशी असं बदललं. सध्या पोलिसांना आसिफच्या शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा आहे. गुरुवारी रात्री 11 वाजता भोगल बाजार लेनजवळ आरोपींनी आसिफची धारदार शस्त्रांनी हत्या केल्याचं पोलिसांनी सांगितलंय.
स्कूटीच्या पार्किंगच्या वादातून दोघांनी आसिफची हत्या केल्याचं कळतंय. इतकंच नव्हे तर आरोपींनी याआधी नोव्हेंबर 2024 मध्येही आसिफशी भांडण केल्याची माहिती त्याच्या कुटुंबीयांनी दिली. या हत्येप्रकरणी पोलिसांनी उज्ज्वल आणि गौतम या दोघांना अटक केली आहे. हे दोघं सख्खे भाऊ आहेत. यापैकी उज्ज्वल 19 वर्षांचा आणि त्याचा भाऊ गौतम 18 वर्षांचा आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आधी उज्ज्वलने आसिफवर हल्ला केला आणि त्यानंतर गौतमनेही त्याची साथ दिली. या हल्ल्यानंतर आसिफला रुग्णालयात दाखल केलं असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषत केलं.
सीसीटीव्ही फुटेज समोर
42 वर्षीय आसिफ कुरेशी आणि उज्ज्वल-गौतम यांचं घर जंगपुरा भोगलच्या चर्च लेनमध्ये आहे. हे दोघं एकमेकांचे शेजारी आहेत. याआधीही त्यांच्यात छोट्या-छोट्या गोष्टींवरून भांडण झालं होतं. गुरुवारी रात्री 10.30 च्या सुमारास आरोपींनी त्यांची स्कूटर आसिफच्या घराच्या बाहेर पार्क केली होती. त्याचा सीसीटीव्ही फुटेजसुद्धा समोर आला आहे. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये पहायला मिळतंय की, दोघं भाऊ आसिफला जमीनीवर ढकलून मारत आहेत. त्यात काही लोक त्याला वाचवण्याचाही प्रयत्न करत आहेत.
स्कूटर हटवण्यावरून वाद
आसिफने त्याच्या घरासमोरून स्कूटर हटवण्यास सांगितलं तेव्हा उज्ज्वलसोबत त्याचं भांडण झालं होतं. त्याचदरम्यान त्याचा भाऊ गौतमसुद्धा तिथे आला. या तिघांमधील वाद वाढत गेला आणि आसिफवर आरोपींनी धारदार शस्त्राने वार केले.
