पूर्व पतीच्या निधनानंतर करिश्मा कपूरला हवाय 30,000 कोटींच्या संपत्तीत वाटा? गोठवली आईची बँक खाती
अभिनेत्री करिश्मा कपूरचा पूर्व पती संजय कपूरच्या निधनानंतर त्याची हजारो कोटींची संपत्ती कोणाला मिळणार, याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. अशातच करिश्मालाही तिच्या पूर्व पतीच्या संपत्तीत वाटा हवा असल्याची माहिती समोर येत आहे.

अभिनेत्री करिश्मा कपूरचा पूर्व पती संजय कपूरचं 12 जून 2025 रोजी निधन झालं. त्याच्या निधनाला एक महिना उलटून गेल्यानंतर आता त्याच्या कुटुंबाशी संबंधित 30 हजार कोटी रुपयांच्या मालमत्तेचा वाद समोर येत आहे. संजय कपूर यांच्या ‘सोना कॉमस्टार’ या कंपनीत माझा मोठा वाटा असल्याचा दावा त्याची आई राणी कपूर यांनी केला आहे. त्यामुळे इस्टेटची मीच योग्य मालकीण आहे, असं म्हणत त्यांनी इतरांवर आरोप केला आहे. काही जण कुटुंबाचा वारसा हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्याचप्रमाणे सोना ग्रुपचा प्रतिनिधी म्हणून कोणालाही नियुक्त केलं नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. ‘जागरण’ने दिलेल्या वृत्तानुसार, संजयची पूर्व पत्नी आणि अभिनेत्री करिश्मा कपूरनेही त्याच्या गडगंज संपत्तीत तिचा वाटा मागितल्याचं उघड झालं आहे. परंतु याबाबत अद्यात करिश्मा किंवा तिच्या कुटुंबीयांनी कोणतीच अधिकृत प्रतिक्रिया दिली नाही.
संजयची आई राणी कपूर यांनी त्यांच्या बँक खाती गोठवण्यात आल्याचा खुलासा केला आहे. ज्यामुळे त्या आर्थिकदृष्ट्या अडचणीत आल्या आहेत. करिश्मा कपूरने 2003 मध्ये संजयशी लग्न केलं होतं. लग्नाच्या 11 वर्षांनंतर त्यांनी घटस्फोट घेतला. या दोघांना समायरा आणि कियान ही दोन मुलं आहेत. 12 जून रोजी लंडनमध्ये पोलो खेळताना संजय कपूरचं निधन झालं. पोलो खेळताना त्याच्या तोंडात अचानक एक मधमाशी गेली आणि घशात तिने चावा घेतल्याने त्याला श्वास घेण्यात अडचण निर्माण झाली होती. यामुळे हृदयविचाराचा झटका येऊन त्याचं निधन झाल्याचं म्हटलं गेलं होतं. 19 जून रोजी नवी दिल्लीत त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
संजय कपूरची आई राणी कपूर यांनी त्यांच्या मुलाच्या निधनानंतर सोना कॉमस्टार ग्रुपमध्ये घेतलेल्या निर्णयांबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली आहे. माझ्या माहितीशिवाय आणि उपस्थितीशिवाय महत्त्वाचे निर्णय घेण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. इतकंच नव्हे तर त्यांनी सून प्रिया सचदेवसह काही व्यक्तींचा कंपनीच्या बोर्डात समावेश करण्यावर प्रश्न उपस्थित केला.
करिश्मा कपूरला घटस्फोट दिल्यानंतर संजयने त्यांच्या मुलांसाठी 14 कोटी रुपये बाँडमध्ये गुंतवले होते, ज्याचं वार्षिक व्याज 10 लाख रुपये मिळत होते. त्याचप्रमाणे संजयच्या वडिलांची मुंबईतील मालमत्तासुद्धा करिश्माला हस्तांतरित करण्यात आली होती.
