अक्षय कुमार, अर्शद वारसी हाजिर हो..; पुणे न्यायालयाचा दणका, काय आहे प्रकरण?
'जॉली एलएलबी 3' या चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला असून आता त्यावरून वाद निर्माण झाला आहे. पुणे न्यायालयाने या चित्रपटातील मुख्य अभिनेते अक्षय कुमार आणि अर्शद वारसी यांना दणका दिला आहे.

‘जॉली एलएलबी’ या चित्रपटाचे दोन भाग याआधी प्रदर्शित झाले असून आता जॉली एलएलबीचा तिसरा भाग येत्या 19 सप्टेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. वकील आणि न्यायालयाभोवती या चित्रपटाचं कथानक घडतंय. परंतु स्वातंत्र्याच्या (सिनेमॅटिक लिबर्टीच्या) नावाखाली चित्रपटातील कलाकार आणि निर्माते यांनी चित्रपटात थेट वकिल आणि न्यायाधीशांवर असभ्य भाषेत विनोद केले आहेत, असा आरोप होत आहे. हा चित्रपट प्रदर्शित होऊ नये यासाठी पुण्यातील नामांकित वकील ॲड. वाजेद खान (बिडकर) आणि ॲड. गणेश म्हस्के यांनी दिवाणी न्यायाधीश, पुणे यांच्या न्यायालयात प्रकरण दाखल केलं आहे.
दिवाणी न्यायाधीश, पुणे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत अभिनेता अक्षय कुमार आणि अर्शद वारसी यांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. येत्या 28 ऑगस्ट रोजी अक्षय आणि अर्शदला कोर्टात हजर राहावं लागणार आहे. याविषयी ॲड. वाजिद खान म्हणाले, “जॉली एलएलबी 3 या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून त्यामध्ये चित्रपटातील कलाकार अक्षय कुमार आणि अर्शद वारसी यांनी वकिलांचा बॅण्ड (बो) घालून चित्रपटाचं प्रमोशन केलं आहे. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे वकिलांची प्रतिमा मलिन करण्यात आलेली आहे. त्याच बरोबर चित्रपटात वकिली व्यवसायाचा अवमान केला आहे.”
View this post on Instagram
वाजेद खान आणि गणेश म्हस्के यांनी दिवाणी न्यायालयात धाव घेवून चित्रपटावर मनाई हुकूम मिळण्यासाठी मागणी केली आहे. आर. सी. एस. क्रमांक 878/2024 त्यानुसार वरिष्ठ विभागातील 12 वे ज्युनियर दिवाणी न्यायाधीश जे. जी. पवार यांनी चित्रपटाचे निर्माते आणि कलाकार यांना समन्स बजावले असून त्यांना पुणे कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. येत्या 28 ऑगस्ट रोजी पहिली तारीख असून अक्षय कुमार, अर्शद वारसी हाजिर हो असं नेहरबान कोर्टानं म्हटल्याने ‘जॉली एलएलबी 3’ हा चित्रपट प्रदर्शनाच्या आधीच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.
‘जॉली एलएलबी’ हा पहिला चित्रपट 2013 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाच्या यशानंतर 2017 मध्ये ‘जॉली एलएलबी 2’ प्रेक्षकांच्या भेटीला आला. या दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला. पहिल्या भागात अर्शद वारसी मुख्य भूमिकेत होता. तर दुसऱ्या भागात अक्षय कुमारने एण्ट्री घेतली. आता तिसऱ्या भागात अक्षय आणि अर्शद हे दोघं एकत्र आले आहेत.
