Amitabh Bachchan : KBC होस्ट करणं सोपं नाही.. बिग बींनी मांडली मनातील खळबळ
अमिताभ बच्चन यांनी 'कौन बनेगा करोडपती' (KBC) होस्ट करताना येणाऱ्या भावनिक आव्हानांवर नुकत्याच लिहिलेल्या ब्लॉगमध्ये प्रकाश टाकला आहे. स्पर्धकांच्या हृदयद्रावक कथा ऐकून अनेकदा शो सुरू ठेवणे कठीण होते, असे बिग बींनी नमूद केलं.

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) गेल्या अनेक वर्षांपासून “कौन बनेगा करोडपती” हा क्विझ शो होस्ट करत आहे. त्यांचा भारदस्त आवाज पण तितकंच नम्र बोलणं, करारी डोळे आणि लोकांचं लक्ष वेधून घेण्याची हातोटी यामुळे हा शो कित्येक काळापासून लोकप्रिय आहे. सध्या केबीसीचा 18 वा सीझन सुरू आहे आणि हा प्रवास खरंच अद्भुत आहे. अमिताभ बच्चन सोशल मीडियावर बरेच ॲक्टिव्ह असतात, चाहत्यांना ते अपेडट देत असतात. त्याचसोबत ते नियमितपणे ब्लॉगही लिहीतात. नुकतंच त्यांनी लिहीलेल्या ब्लॉगमध्ये केबीसीबद्दल काही लिहीलं. या शो मध्ये अनेकदा असे क्षण येता की, ज्यामुळे शो सुरू ठेवणं कठीण होतं, असं बिग बी यांनी नमूद केलं. केबीसी होस्ट करताना कोणकोणत्या मानसिक आव्हानांचा सामना करावा लागतो हेच बिग बींनी आपल्या ब्लॉगमधून मांडलं. हा शो सुरू ठेवणं अनेकदा कठीम जातं, असं अमिताभ यांनी लिहीलं.
होस्टिंग सुरू ठेवणं होतं कठीण
जेव्हा केबीसीमध्ये हॉटसीटवर स्पर्धक अमिताभ बच्चन यांच्यासमोर बसतात, तेव्हा ते त्यांच्याषी गप्पा मारतात, विविध विषयांवर संवाद साधतात. कधीकधी ते आपल्या खासगी जीवनातील कहाणी किंवा कुटुंबियांशी निगडीत एखादी गोष्टही सांगतात. शोसाठी या कहाण्या चांगल्या ठरतात, पण त्यांनी ज्या आव्हानांच सामना केला, ते ऐकल्यावर शो सुरू ठेवणं हे अमिताभ यांच्यासाठी खूप कठीण होतं. बिग बींनी आपल्या ब्लॉगमध्ये पुढे लिहीलं की, काही खेळाडूंचे अनुभव अतिशय गंभीर असतात, त्यांची कहाणी ऐकून मन द्रवतं. त्यांच्या कहाण्या ऐकून मनावर परिणाम न होऊ देता, खेळ सुरू ठेवत शूटिंग पूर्ण करणं खूपच कठीण असतं, असं त्यांनी म्हटलं.
हृदय पिळवटून टाकणारा ठरला अनुभव
बिग बींनी आपल्या ब्लॉगमध्ये लिहिलं, ‘काही स्पर्धक इतक्या वेदनादायक वैयक्तिक कहाण्या घेऊन येतात की, त्यांच्याबद्दलच्या आपल्या भावना आवरणेच नव्हे, तर शो पुढे होस्ट करत राहणेही कठीण होऊन जाते.’ अमिताभ बच्चन यांनी याबाबत अधिक खुलासा न करता लिहीलं की, ‘कौन बनेगा करोडपती’ होस्ट करणे हा त्यांच्यासाठी एक हृदय पिळवटून टाकणारा अनुभव ठरला आहे. रात्र बरीच झालीये, आता मी लिहीणं थांबवतो, असं म्हणत अमिताभ यांनी आपला ब्लॉग आवरता घेतला.
अमिताभ यांचं काम
‘कौन बनेगा करोडपती’बद्दल बोलायचं झालं तर अमिताभ बच्चन हे या शोचा 18वा सीझनही होस्ट करत आहेत. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचं वय 83 असलं तरी ते अजूनही कामाच्या बाबतीत खूप सक्रिय आहेत. अमिताभ बच्चन केवळ तासन्तास या शोचं शूटिंग करत नाहीत, तर आजही ते ‘केबीसी’चे सूत्रसंचालन पूर्वीप्रमाणेच दमदार अंदाजात करताना दिसतात. केबीसीच्या यंदाच्या सीझनची थीम ‘सोचना पड़ेगा’ अशी ठेवण्यात आली आहे. आतापर्यंत या शोमध्ये अनेक कमाल स्पर्धक पाहायला आलेत, ज्यांनी 1 कोटी रुपयांच्या टप्प्यापर्यंत मजल मारली.
