Amit Thackeray: त्याच्या एकंदरीत वागण्याचा अंदाज पाहता एक दिवस..; अमित ठाकरेंविषयी केदार शिंदे स्पष्टच बोलले..
अमित ठाकरे यांच्यासाठी प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे यांनी सोशल मीडियावर खास पोस्ट लिहिली आहे. रविवारी ठाकरे बंधूंचा 'गर्जना मोर्चा' पार पडला. याच मोर्चातील एक खास फोटो शेअर करत केदार शिंदेंनी ही पोस्ट लिहिली आहे.

ठाकरे बंधूंच्या रविवारी पार पडलेल्या ‘गर्जना मोर्चा’नंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या मोर्चात राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्यासह मोठ्या संख्येने मनसे आणि शिवसेना (ठाकरे गट) कार्यकर्ते सहभागी झाले होते. मोर्चादरम्यानचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतानाच प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे यांनी अमित ठाकरेंसाठी केलेली एक पोस्ट चर्चेचा विषय ठरली आहे. केदार शिंदे यांनी सोशल मीडियावर अमित ठाकरे आणि राज ठाकरे यांचा एक फोटो शेअर केला आहे. ‘गर्जना मोर्चा’दरम्यानचा हा फोटो असल्याचं त्यांच्या पोस्टवरून स्पष्ट होतं. या फोटोसोबत केदार शिंदे यांनी अमित ठाकरेंच्या राजकीय भवितव्याबाबत मोठं विधान केलं आहे. त्यांनी अमित यांच्या व्यक्तिमत्त्वावर आणि त्यांच्या वागण्याच्या पद्धतीवर विश्वास व्यक्त करत त्यांचं कौतुक केलं आहे.
केदार शिंदे यांची पोस्ट-
केदार शिंदे यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिलं, ‘मला या मुलाच्या भावनांची कदर आहे. वटवृक्ष याच्या सावलीत वृक्ष मुळं धरत नाहीत असं म्हटलं जातं. पण मला खात्री अमित विषयी वाटते. त्याला अगदी जवळून पाहतोय. त्याच्या एकंदरीत वागण्याचा अंदाज पाहता एक दिवस असा येईल की, अमितचे वडील म्हणून राज ठाकरे ओळखले जातील.’
पहा फोटो-
View this post on Instagram
या विधानातून केदार शिंदे यांनी अमित ठाकरे यांच्याबद्दल असलेला विश्वास व्यक्त केला आहे. राज ठाकरे यांच्यासारख्या प्रभावी राजकीय व्यक्तिमत्त्वाच्या सावलीत अमित ठाकरे आपली स्वतंत्र ओळख निर्माण करतील, असा विश्वास त्यांच्या पोस्टमधून दिसून येतो. त्यामुळेच केदार शिंदे यांची ही पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आलं आहे.
दरम्यान, रविवारी झालेला ठाकरे बंधूंचा ‘गर्जना मोर्चा’ हा राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा ठरला. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच मंचावर आल्याने या मोर्चाकडे राज्याचं लक्ष लागलं होतं. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्येही या एकत्रित शक्तिप्रदर्शनाचा उत्साह पाहायला मिळाला. या पार्श्वभूमीवर अमित ठाकरे यांच्याबद्दल केदार शिंदे यांनी केलेलं विधान विशेष लक्षवेधी ठरत आहे. अमित ठाकरे सध्या राजकारणात सक्रिय असून विविध राजकीय आणि सामाजिक मुद्द्यांवर त्यांची भूमिका पाहायला मिळते. त्यांच्या कामाची आणि शैलीची चर्चा मनसेच्या कार्यकर्त्यांमध्येही होत असते. केदार शिंदे यांच्या पोस्टमुळे अमित ठाकरेंच्या भविष्यातील राजकीय वाटचालीबाबत नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे.
