जो सलमानसोबत काम करणार त्याचा गेम ओव्हर..; कपिल शर्माला धमकी
कॉमेडियन कपिल शर्माच्या कॅनडामधील कॅफेवर दुसऱ्यांदा गोळीबार करण्यात आला आहे. या घटनेनंतर आता थेट धमकीचा ऑडिओ समोर आला आहे. जो सलमान खानसोबत काम करणार, त्याचा थेट गोळ्या झाडणार, अशी धमकी देण्यात आली आहे.

कॉमेडियन कपिल शर्माच्या कॅनडामधील ‘कॅप्स कॅफे’वर दोन वेळा गोळीबार झाला. आता याप्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. ‘कॅप्स कॅफे’वर गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईच्या गँगकडूनच गोळीबर झाल्याचं कळतंय. अभिनेता सलमान खानशी जवळीक साधल्याची किंमत कपिलला चुकवावी लागत असल्याची धमकी या गँगकडून देण्यात आली आहे. लॉरेन्स बिष्णोई आणि सलमान खानचा वाद हा काळवीट शिकार प्रकरणापासूनच आहे. याआधी नेते बाबा सिद्दिकी यांचीही बिष्णोई गँगकडून हत्या करण्यात आली होती. आता कपिललाही थेट जीवे मारण्याची धमकी दिली आहे.
गँगस्टर हॅरी बॉक्सरचा ऑडिओ समोर
लॉरेन्स बिष्णोई ग्रुपचा गँगस्टर हॅरी बॉक्सरचा एक ऑडिओ समोर आला आहे. यामध्ये त्याने म्हटलंय की सलमान खानला ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’मध्ये बोलवल्यामुळे कॅप्स कॅफेवर गोळीबार करण्यात आला आहे. कपिल शर्माचा हा शो नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांच्या भेटीला येतो. सध्या या शोचा दुसरा सिझन सुरू असून त्याच्या पहिल्याच एपिसोडमध्ये सलमानला पाहुणा म्हणून बोलावण्यात आलं होतं. याचाच सूड घेण्यासाठी कपिलच्या कॅफेवर गोळीबार करण्यात आल्याचं ऑडिओमध्ये म्हटलंय. इतकंच नव्हे तर ‘जो सलमानसोबत काम करणार, तो मरणार’ अशी थेट धमकीच त्यात देण्यात आली आहे.
View this post on Instagram
या ऑडिओमध्ये हॅरी बॉक्सर संपूर्ण फिल्म इंडस्ट्रीला धमकावत म्हणतोय, “कपिल शर्माच्या रेस्टॉरंटवर याआधी आणि आता गोळीबार यासाठी झाला, कारण त्याने सलमान खानला त्याच्या शोमध्ये बोलावलं होतं. पुढच्या वेळी दिग्दर्शक, निर्माते, कलाकार यांना कोणताच इशारा किंवा वॉर्निंग देणार नाही. थेट छातीवर गोळ्या झाडणार. मुंबईतल्या सर्व कलाकारांना, निर्मात्यांना हा इशारा आहे. आम्ही मुंबईचं वातावरण इतकं खराब करू की तुम्ही कधी विचारसुद्धा केला नसेल. सलमानसोबत काम करणाऱ्या छोट्या किंवा मोठ्या कलाकाराला, दिग्दर्शकाला आम्ही सोडणार नाही. आम्ही त्याला मारून टाकू. त्यासाठी कोणत्याही पातळीला जावं लागलं तरी आम्ही जाऊ. जर सलमान खानसोबत कोणी काम केलं, तर स्वत:च्या मृत्यूचा जबाबदार तो स्वत: असेल.”
कपिल शर्माला मिळालेल्या या धमकीनंतर इंडस्ट्रीत भीतीचं वातावरण आहे. लॉरेन्स बिष्णोई आणि सलमान यांचं शत्रुत्व खूप जुनं आहे. काळवीट शिकार प्रकरणापासून लॉरेन्स बिष्णोई हा सलमानच्या मागे लागला आहे. त्याला अनेकदा जीवे मारण्याच्या धमक्याही देण्यात आल्या आहेत. इतकंच नव्हे तर सलमानच्या घरावर गोळीबारही करण्यात आला होता. सुदैवाने यात कोणीही जखमी झालं नव्हतं. तेव्हापासून सलमान आणि त्याच्या घराबाहेरची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. काळवीर शिकार प्रकरणी सलमानने बिष्णोई समाजाची जाहीर माफी मागावी, अशी त्याची मागणी आहे.
