कोर्टात खेचलं..; पदार्पणानंतर हिरोइनच्या आयुष्यात वादळ, भीषण अपघातानंतर बिघडला चेहरा
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ही अभिनेत्री तिच्या संघर्षाविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. अनेक चित्रपटांमधून तिला काढून टाकण्यात आलं होतं. यादरम्यान तिचा भीषण अपघातसुद्धा झाला होता. या अपघातात तिच्या चेहऱ्यावर असंख्य काचेचे तुकडे रुतले गेले होते.

बॉलिवूड इंडस्ट्रीत या अभिनेत्रीला यश तर मिळालं, परंतु नशीबाने तिच्यासमोर बऱ्याच समस्या उभ्या केल्या. करिअरच्या शिखरावर असताना या अभिनेत्रीच्या आयुष्यात अनेक चढउतार आले. पदार्पणानंतरच तिला काही चित्रपटांमधून काढून टाकण्यात आलं. अशातच तिचा भीषण अपघात झाला आणि त्या अपघातात तिच्या चेहऱ्यावर असंख्या काचेचे तुकडे रुतले गेले. हा सर्व संघर्ष वाट्याला आल्यानंतर आता काही महिन्यांपूर्वी तिला ब्रेस्ट कॅन्सरचंही निदान झालं होतं. कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजाराचा सामना केल्यानंतर ही अभिनेत्री नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या आयुष्यातील आव्हानांविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. ही अभिनेत्री दुसरी-तिसरी कोणी नसून महिमा चौधरी आहे.
“पदार्पणानंतर मला अनेक समस्यांचा सामना करावा लागला होता. मला माझ्या पहिल्याच चित्रपटानंतर कोर्टात खेचलं गेलं. तर अनेक चित्रपटांमधून मला काढून टाकलं होतं. मग माझा अपघात झाला आणि त्यानंतर वर्षभर मी घरीच बसून राहिले. कमबॅक करताना मला छोट्याच भूमिका मिळत होत्या. तरीही मी हार न मानता त्या भूमिका स्वीकारल्या आणि त्यात विशेष छाप सोडली. एका चित्रपटात मी फक्त एका गाण्यापुरतीच झळकली होती. पण ते गाणंसुद्धा हिट झालं आणि नंतर मला फक्त सिंगल गाण्याचेच ऑफर्स मिळू लागले. पण मला त्यापेक्षा जास्त काम करायचं होतं”, असं ती म्हणाली.
View this post on Instagram
बॉलिवूडमध्ये करिअरच्या शिखरावर असताना अचानक महिमा इंडस्ट्रीपासून दूर गेली होती. 1999 मध्ये ‘दिल क्या करे’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान बेंगळुरूमध्ये महिमाच्या कारचा भीषण अपघात झाला होता. या अपघातात असंख्य काचेचे तुकडे महिमाच्या चेहऱ्यावर रुतले गेले होते. अपघाताच्या भीषण आठवणींबद्दल ती पुढे म्हणाली, “माझ्या चेहऱ्यावर 67 छोटे-छोटे काचेचे तुकडे रुतले गेले होते, जे नंतर काढण्यात आले. दुसऱ्या दिवशी माझाच चेहरा मी आरशात बघू शकत नव्हते. माझे मित्रमैत्रिणी माझ्या चेहऱ्याकडे बघून हसत होते. त्यांना वाटलं की माझं कोणाशी तरी भांडण झालंय आणि मी त्यांना खोटं सांगतेय.”
त्यावेळी या अपघाताबद्दल बोलण्यास खूप घाबरल्याचं महिमाने स्पष्ट केलं. कोणीच आपल्याला समजून घेणार नाही, पाठिंबा देणार नाही, असं तिला वाटलं होतं. त्या कठीण काळात अभिनेता अजय देवगणने खूप साथ दिल्याचं महिमाने सांगितलं. शूटिंगदरम्यान अजयने खूप काळजी घेतली आणि त्याने मला पुरेसा वेळसुद्धा दिला होता, असं ती म्हणाली.
