स्वानंदी टिकेकरच्या आईला महाराष्ट्र सरकारकडून पुरस्कार जाहीर, शास्त्रीय संगीतात कमावलंय मोठं नाव
सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखालील तज्ज्ञांची समिती या पुरस्कारांची शिफारस करत असते. विविध क्षेत्रात योगदान देणाऱ्या मान्यवरांना या पुरस्काराने गौरविण्यात येते.

Arati Ankalikar Tikekar Award : राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे देण्यात येणारा यंदाचा भारतरत्न पंडित भीमसेन जोशी जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. ज्येष्ठ शास्त्रीय गायिका आरती अंकलीकर-टिकेकर यांना यंदाचा भारतरत्न पंडित भीमसेन जोशी जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. पाच लाख रुपये, मानपत्र, स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप आहे.
सांस्कृतिक पुरस्कारांची घोषणा
राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत दरवर्षी विविध पुरस्कार प्रदान केले जातात. आता सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काही जीवनगौरव पुरस्कारांची आणि बारा राज्य सांस्कृतिक पुरस्कारांची घोषणा केली आहे. सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखालील तज्ज्ञांची समिती या पुरस्कारांची शिफारस करत असते. विविध क्षेत्रात योगदान देणाऱ्या मान्यवरांना या पुरस्काराने गौरविण्यात येते. यंदा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांना जाहीर झाला आहे. यासोबतच, नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार, संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार, भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवन गौरव पुरस्कार, ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार, तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगांवकर जीवनगौरव पुरस्कारांचीही घोषणा करण्यात आली आहे.
शास्त्रीय संगीतातील मोठं नाव
आरती अंकलीकर टिकेकर हे शास्त्रीय संगीतातील मोठं नाव आहे. गेल्या तीन दशकांहून अधिक काळ आपल्या सुरैल आवाजाने त्या श्रोत्यांची मनं जिंकत आहेत. केवळ भारतच नाही तर जगभरातील विविध संगीत महोत्सवांमध्ये आरती अंकलीकर या भाग घेतात. जगभरात त्यांच्या शास्त्रीय संगीताचे लाखो चाहते आहे. त्यांनी स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आरती अंकलीकर यांचा जन्म २७ जानेवारी १९६३ रोजी कर्नाटकातील विजापूरमध्ये झाला. त्यांनी त्यांच्या संगीताचे शिक्षण पं.वसंतराव कुलकर्णी आणि नंतरचे शिक्षण किशोरी आमोणकर यांच्याकडे घेतले.
अनेक पुरस्काराने गौरव
आरती अंकलीकर-टिकेकर यांना आतापर्यंत अनेक पुरस्कार मिळाले आहेत. ‘अंतर्नाद’ या कोकणी चित्रपटातील गाण्यासाठी २००६ साली सर्वोत्तम पार्श्वगायिकेचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्यानंतर सर्वोत्तम पार्श्वगायिका म्हणून त्यांना महाराष्ट्र राज्याचा पुरस्कार मिळाला. तसेच २०१३ साली त्यांना मराठी चित्रपट संहितासाठी पुन्हा एकदा सर्वोत्तम पार्श्वगायिकेचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. त्यांनी भारतातील सर्वच महत्त्वाच्या रंगमंचांवरून, संगीत महोत्सवांतून, तसेच आकाशवाणी, दूरदर्शनसारख्या माध्यमांतून त्यांनी गायन केले आहे.
आरती अंकलीकर-टिकेकर यांच्या आई सरला व वडील मोहन अंकलीकर यांनी कायमच त्यांच्या गाण्याला प्रोत्साहन दिले. आरती अंकलीकर यांनी प्रसिद्ध अभिनेते उदय टिकेकर यांच्याशी लग्नगाठ बांधली. लग्नानंतरही आरती अंकलीकर-टिकेकरांची संगीत कारकीर्द उत्तमरित्या सुरु आहे. आरती आणि उदय यांना एक मुलगी असून स्वानंदी टिकेकर असे तिचे नाव आहे. स्वानंदी टिकेकर ही प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने आतापर्यंत अनेक मराठी मालिकांमध्ये काम केले आहे. एक उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच ती उत्तम गायिका देखील आहे.
