‘पावनखिंड’मध्ये रायाजी साकारणाऱ्या अंकितची पत्नी आहे ‘ही’ लोकप्रिय अभिनेत्री
दिग्पाल लांजेकर (Digpal Lanjekar) दिग्दर्शित 'पावनखिंड' या चित्रपटात रायाजीराव बांदल यांची भूमिका अभिनेता अंकित मोहनने (Ankit Mohan) साकारली आहे. विशेष म्हणजे याच चित्रपटात अंकितच्या पत्नीने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे.

शिवकालीन इतिहासातील सुवर्णपान असणाऱ्या ‘पावनखिंड’चा (Pavankhind) उल्लेख येताच बाजीप्रभू देशपांडे यांच्या जोडीला आणखी दोन शूरवीरांची नावं अनाहूतपणे समोर येतात. शिवचरित्रातील या महत्त्वपूर्ण अध्यायातील दोन अजरामर नावं म्हणजे श्रीमंत कोयाजीराव बांदल आणि श्रीमंत रायाजीराव बांदल. पावनखिंडीचा रक्तरंजीत इतिहास सांगणाऱ्या या चित्रपटात कोयाजीराव आणि रायाजीराव या बांदल बंधूंनी दिलेल्या बलिदानाची आणि त्यांच्या शौर्याची गाथाही पहायला मिळणार आहे. दिग्पाल लांजेकर (Digpal Lanjekar) दिग्दर्शित ‘पावनखिंड’ या चित्रपटात रायाजीराव बांदल यांची भूमिका अभिनेता अंकित मोहनने (Ankit Mohan) साकारली आहे. चित्रपटातील त्याच्या दमदार अभिनयाचं प्रेक्षक-समीक्षकांकडून कौतुक होत आहे. या भूमिकेसाठी अंकितने त्याच्या शरीरयष्टीवर खूप मेहनत घेतली आहे. त्याची ही मेहनत मोठ्या पडद्यावर सहज पहायला मिळते. अंकितची पत्नीसुद्धा मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
अंकितची पत्नी मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री असून रुची सवर्ण असं तिचं नाव आहे. ‘पावनखिंड’ या चित्रपटात तिने सोयराबाईंची भूमिका साकारली आहे. तर अंकित आणि रुची या दोघांनीही ‘फत्तेशिकस्त’ या चित्रपटातही एकत्र काम केलं होतं. रुची आणि अंकित यांनी २ डिसेंबर २०१५ रोजी लग्नगाठ बांधली. रुचीने मराठी चित्रपटांसोबतच हिंदी आणि मराठी मालिकांमध्येही काम केलं आहे. कुंडली भाग्य, घर आजा परदेसी, कुमकुम भाग्य यांसारख्या लोकप्रिय हिंदी मालिकांमध्ये रुचीने भूमिका साकारल्या आहेत.
View this post on Instagram
View this post on Instagram
लेखक, दिग्दर्शक, अभिनेता दिग्पाल लांजेकर यांच्या ‘शिवराज अष्टक’ या संकल्पनेतून पडद्यावर आलेल्या ‘फर्जंद’ आणि ‘फत्तेशिकस्त’ या चित्रपटांनंतर ‘पावनखिंड’ हा तिसरा महत्त्वाचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. शिवजयंतीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर १० कोटी रुपयांहून अधिक गल्ला जमवला आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून या चित्रपटाला जोरदार प्रतिसाद मिळत आहे.
संबंधित बातम्या: बॉक्स ऑफिसवर ‘पावनखिंड’ सुसाट; जाणून घ्या पहिल्या आठवड्याची कमाई
संबंधित बातम्या: ‘पावनखिंड’चा अनोखा विक्रम; चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ
