Nafisa Ali : प्रसिद्ध अभिनेत्रीला पुन्हा कॅन्सर, आता सर्जरीही नाही शक्य; भावूक पोस्टने चाहत्यांच्या डोळ्यात आणलं पाणी
Nafisa Ali : अभिनेत्री नफीसा अलीला पुन्हा एकदा कॅन्सरचं निदान झालं आहे. याआधी 2018 मध्ये त्यांच्यावर कॅन्सरचे उपचार झाले होते. आता पुन्हा या आजाराने डोकं वर काढलं असून आता सर्जरीचाही पर्याय नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे नफीसा यांच्यावर कीमोथेरेपी होणार आहे.

बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्री नफीसा अली यांनी सोशल मीडियावर भावूक पोस्ट लिहित आरोग्याविषयी महत्त्वपूर्ण माहिती दिली. नफीसा यांना चौथ्या स्टेजचा कॅन्सर झाला असून त्यांच्यावर कीमोथेरेपी सुरू करण्यात येणार आहे. आता शस्त्रक्रियेचा पर्याय नसल्याने कीमोथेरेपी करावी लागणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. नोव्हेंबर 2018 मध्ये नफीसा यांना पेरिटोनियल कॅन्सरचं निदान झालं होतं. त्यावरील उपचारानंतर त्या बऱ्या झाल्या होत्या. परंतु आता पुन्हा त्यांना कॅन्सरचं निदान झालं आहे. नफीसा यांनी मंगळवारी सोशल मीडियावर अत्यंत भावूक पोस्ट लिहिली होती. या पोस्टवर नेटकऱ्यांनी आणि बॉलिवूडमधील इतर सेलिब्रिटींनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.
नफीसा अली यांची पोस्ट-
‘एकेदिवशी माझ्या मुलांनी मला विचारलं की, जेव्हा तू इथे नसशील, तेव्हा आम्ही कोणाकडे जायचं? तेव्हा मी त्यांना सांगितलं की, एकमेकांचा आधार घ्या. माझ्यासाठी हीच मोठी भेट आहे. भाऊ-बहीण जे एकमेकांवर खूप प्रेम करतात. एकमेकांची रक्षा करा आणि लक्षात ठेवा की तुमचं नातं हे आयुष्यातील कोणत्याही आव्हानापेक्षा अधिक मजबूत आहे’, अशी पोस्ट त्यांनी लिहिली आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये त्यांनी कीमोथेरपी सुरू करणार असल्याची माहिती दिली. ‘आजपासून माझ्या जीवनाच्या प्रवासातील एक नवीन अध्याय सुरू होत आहे. काल माझा पीईटी स्कॅन झाला होता.. तर आता कीमोथेरेपी सुरू करावी लागेल. कारण सर्जरी शक्य नाही. विश्वास ठेवा, मला आयुष्यावर खूप प्रेम आहे’, अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.
View this post on Instagram
नफीसा यांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवरही एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांच्या स्कॅनचा आणि त्यांचा स्वत:चा एक फोटो आहे. त्याचसोबत त्यांनी एका लेखाचा स्क्रीनशॉटसुद्धा शेअर केला आहे. या लेखात चौथ्या स्टेजचा कॅन्सर, त्याची वाढ आणि जगण्याची शक्यता याबद्दलची माहिती आहे. त्यावरून त्यांचा कॅन्सर चौथ्या स्टेजवर पोहोचल्याचं कळतंय.
नफीसा अली यांनी 1979 मध्ये ‘जुनून’ या चित्रपटातून करिअरची सुरुवात केली होती. या चित्रपटात त्या अभिनेते शशी कपूर यांच्यासोबत झळकल्या होत्या. शशी कपूर यांच्याशिवाय इतरही मोठमोठ्या अभिनेत्यांसोबत त्यांनी काम केलं. अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘मेजर साहब’, धर्मेंद्र यांच्यासोबत ‘आतंक’ आणि विनोद खन्ना यांच्यासोबत ‘क्षत्रिय’मध्ये त्यांनी भूमिका साकारल्या आहेत. तर ‘लाइफ इन अ मेट्रो’, ‘गुजारिश’, ‘यमला पगला दिवाना’ आणि ‘बेवफा’ यांसारख्या चित्रपटांमधून त्या प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. नफीसा यांनी 1996 मध्ये ‘मिस इंडिया’चा किताब जिंकला होता. त्यानंतर त्यांनी आंतरराष्ट्रीय सौंदर्यस्पर्धांमध्येही भारताचं प्रतिनिधित्व केलंय.
