नवाजुद्दीन सिद्दिकीला हायकोर्टाचा दिलासा नाहीच, 100 कोटींचा मानहानीचा खटला फेटाळला
गेल्या काही दिवसांपासून अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. आता अभिनेत्याच्या घरातील भांडणं कोर्टात पोहोचली आहे. अशात अभिनेत्याने दाखल केलेला 100 कोटींचा मानहानीचा खटला कोर्टाने फेटाळला आहे.

Nawazuddin Siddiqui| अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकीला मुंबई हायकोर्टाकडून दिलासा मिळालेला नाही. कोर्टाने 100 कोटींचा मानहानीचा खटला फेटाळला आहे. चित्रपट अभिनेता, निर्माता नवाजुद्दीन सिद्दीकीला मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा नाकारला आहे. नवाजुद्दीनने त्याचा भाऊ शमसुद्दीन सिद्दीकी आणि विभक्त पत्नी अंजना किशोर पांडे यांच्याविरुद्ध दाखल केलेला 100 कोटी रुपयांचा मानहानीचा खटला न्यायालयाने फेटाळून लावला आहे.
न्यायमूर्ती जितेंद्र जैन यांच्या एकलपीठाने हा निर्णय दिला. नवाजुद्दीनने भावावर आर्थिक व्यवस्थापनाची जबाबदारी सोपवली होती. त्यात त्याने विश्वासघात केला आणि पैशांचा गैरव्यवहार केला. तसेच माझी सोशल मीडियात बदनामी केली, असा दावा नवाजुद्दीनने केला होता.
View this post on Instagram
शमसुद्दीनने नवाजुद्दीनच्या खात्यांमधील पैशांचा गैरव्यवहार करण्याबरोबर प्रतिष्ठा मलिन केल्याचा आरोप आहे. याच आरोपांवरुन नवाजुद्दीनने मानहानीचा खटला दाखल केला होता. सांगायचं झालं तर, नवाजुद्दीनचा आरोप आहे की 2008 मध्ये त्याने त्याचा भाऊ शमसुद्दीनला त्याचा मॅनेजर म्हणून नियुक्त केलं कारण त्यावेळी त्याच्या भावाकडे कोणतीही नोकरी नव्हती.
नवाजुद्दीन याने भाऊ शमसुद्दीन याला ऑडिटिंग, आयकर रिटर्न भरणे, जीएसटी भरणे आणि इतर कर भरणे अशी कामे सोपवली होती. अभिनेत्याने डोळे बंद करून भावावर विश्वास ठेवला आणि स्वतःचं क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, एटीएम, चेकबुक, बँक पासवर्ड, ईमेल पत्ता आणि सर्व काही भावाला दिलं.
नवाजुद्दीनचा आरोप आहे की शमसुद्दीनने त्याची फसवणूक करण्यास सुरुवात केली. एवढंच नाही तर, शमसुद्दीनने अनेक मालमत्ता संयुक्तपणे खरेदी केल्या परंतु त्या नवाजुद्दीन याच्या नावावर आहेत असं सांगितलं… यामध्ये यारी रोडवरील एक फ्लॅट, शाहपूरमधील एक फार्महाऊस, दुबईमधील एक फार्महाउस, रेंज रोव्हर, बीएमडब्ल्यू, डुकाटी सारख्या 14 वाहनांचा समावेश आहे.
नवाजुद्दीन आणि पूर्व पत्नीचे वाद…
पत्नी आलिया सिद्दीकी (nawazuddin siddiqui wife) हिने केलेल्या गंभीर आरोपांनंतर अभिनेत्याच्या अडचणी वाढल्या. आलिया सिद्दीकी हिने अभिनेत्यावर घरातून बाहेर काढणं, बलात्कार यांसारखे गंभीर आरोप केले आहेत. ज्यामुळे नवाजच्या अडचणींमध्ये मोठी वाढ झालेली.
