मी बुडतोय, मला काहीही करून वाचवा..; इंजीनिअर युवराज मेहताच्या मृत्यूप्रकरणी अभिनेत्यांचा प्रशासनावर संताप
ग्रेटर नोएडामध्ये 70 फूट खोल नाल्यात कार कोसळून 27 वर्षीय सॉफ्टवेअर इंजीनिअर युवराज मेहताचा मृत्यू झाला. मृत्यूपूर्वी दोन तास तो मदतीची प्रतीक्षा करत राहिला होता. याप्रकरणी सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर नोएडाच्या प्रशासनावर तीव्र संताप व्यक्त केला आहे.

ग्रेटर नोएडामध्ये दाट धुक्यामुळे झालेल्या एका अपघातात 27 वर्षीय सॉफ्टवेअर इंजीनिअरने आपले प्राण गमावले. युवराज मेहता असं या तरुणाचं नाव असून शुक्रवारी रात्री सेक्टर 150 जवळ तो कामावरून घरी परतत असताना हा अपघात झाला होता. दाट धुकं आणि रिफ्लेक्टर नसल्याने युवराजची कार दोन ड्रेनेज बेसिन्सना वेगळं करणाऱ्या एका उंच भिंतीला धडकली आणि 70 फूट खोल पाण्याने भरलेल्या खड्ड्यात कोसळली. त्या परिस्थितीतही त्याने वडिलांना मदतीसाठी फोन केला. स्थानिक पोलीस, डाइव्हर्स, एनडीआरएफ पथक यांच्याकडून बचाव मोहीम सुरू करण्यात आली, परंतु तरीही युवराजचे प्राण वाचवण्यात त्यांना यश मिळालं नाही. याप्रकरणी आता सेलिब्रिटींनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
मालिकांमध्ये श्रीकृष्णची भूमिका साकारलेला अभिनेता सौरभ राज जैनने सोशल मीडियावर लिहिलं, ‘नोएडामध्ये जी दुर्घटना घडली, ज्यामध्ये एका तरुण इंजीनिअरचा बुडून मृत्यू झाला, तो दोन तासांपर्यंत मदतीसाठी ओरडत होता. हे अत्यंत भयानक आणि धक्कादायक आहे. नागरिक म्हणून आपण हीच किंमत मोजत आहोत का? आपल्या पैशांवर अवलंबून असलेले अधिकारी वेळेत कारवाई करण्यात अपयशी ठरले. त्याने दोन तास मदतीसाठी याचना केली होती. अधिकाऱ्यांची काहीच जबाबदारी नाही का? त्यांना लाज वाटली पाहिजे.’
सौरभ राज जैनची पोस्ट-

“युवराज मेहता नावाचा तरुण रात्री गाडी चालवत होता. एका बांधकामाच्या साइटला त्याची कार धडकली आणि तो पाण्यात पडला. त्यानंतर त्याने बचावासाठी फोन केले. अग्निशमन विभाग, पोलीस, एनडीआरएफ सर्व घटनास्थळी पोहोचले. क्रेन आल्या, दोरी सोडल्या गेल्या. पण कोणीही पाण्यात शिरलं नाही. तो दोन तास त्याच्या गाडीवर उभा राहिला आणि मला वाचवा अशी विनंती करत राहिला. ज्या सर्व विभागांचं काम लोकांना वाचवणं होतं, ते सर्वजण तिथेच होते. एका डिलिव्हरी बॉ.ने प्रयत्न केला, पण या दोन तासांच्या नाटकानंतरही कोणीही त्या तरुणाला वाचवू शकलं नाही. त्या सर्व विभागांनी राजीनामा द्यावा”, अशा शब्दांत टीव्ही अभिनेता अभिनव शुक्लाने राग व्यक्त केला.
Shame NDRF , Shame Fire Dept , Shame on authorities , you couldn’t save a young kid ! I wonder why your departments even exist if you could not do a basic job for which you train your entire life with tax payers money ! Bravo that Flip-cart Delivery guy who tried ! @PMOIndia… pic.twitter.com/DUBmfw2ymJ
— Abhinav Shukla (@ashukla09) January 19, 2026
या घटनेनंतर युवराजच्या कुटुंबीयांनी तक्रार दाखल केली असून या तक्रारीत त्यांनी प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. सर्व्हिस रोडच्या बाजूला रिफ्लेक्टर्स बसवले गेले नव्हते, गटारावर झाकण नव्हतं… या सर्व बाबी त्यांनी निदर्शनास आणून दिल्या. दाट धुक्यात रिफ्लेक्टर्स नसल्यामुळे हा अपघात झाल्याचा आरोप युवराजच्या वडिलांनी केला आहे.
