शेफालीच्या निधनातून प्रसिद्धी मिळवण्याचा पतीचा प्रयत्न; परागचं कडक उत्तर
शेफाली जरीवालाच्या निधनानंतर तिचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न पती पराग त्यागीकडून केला जात असल्याचा आरोप काही नेटकऱ्यांनी केला. त्यावर आता त्याने सडेतोड उत्तर दिलं आहे.

‘कांटा लगा’ या रिमिक्स गाण्यातून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री शेफाली जरीवालाचं 27 जून रोजी निधन झालं. वयाच्या 42 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने तिने आपले प्राण गमावले. शेफालीच्या निधनानंतर तिचा पती पराग त्यागी पूर्णपणे खचला आहे. दिवंगत पत्नीच्या आठवणीत तो सोशल मीडियावर विविध पोस्ट लिहित आहे. एकीकडे चाहते त्याचं सांत्वन करण्याचा प्रयत्न करत आहेत. तर दुसरीकडे काहीजण त्याच्यावर टीका करत आहेत. शेफालीच्या निधनाचा फायदा उचलून पराग लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतोय, अशी टीका काही नेटकरी करत आहेत. यातून पराग प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या टीकाकारांना आता परागने सडेतोड उत्तर दिलं आहे.
नुकतंच परागने शेफालीचा एक जुना व्हिडीओ शेअर केला होता, ज्यामध्ये तिने त्याचा हात पकडला होता. या व्हिडीओच्या कमेंटमध्ये परागने भलीमोठी पोस्ट लिहित ट्रोलर्सना कडक उत्तर दिलं आहे. त्याने लिहिलं, ‘मी इतक्या लवकर पोस्ट करू नये असं बोलून जे लोक लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांना मी सांगू इच्छितो की भावा.. सर्वजण तुमच्यासारखे नसतात. परीला सोशल मीडियावर राहायला आवडायचं. त्यावरून मिळणाऱ्या प्रेमाला तिने एंजॉय केलं होतं. मला सोशल मीडियावर एवढी सवय नव्हती. परंतु आता ती माझ्या हृदयात आहे. त्यामुळे तिला प्रत्येकाकडून सदैव प्रेम मिळत राहील आणि ती या जगात नसली तरी सोशल मीडियावर कायम राहील याची मी काळजी घेणार आहे. हे अकाऊंट तिच्यासाठीच समर्पित आहे. ज्या प्रेमळ चाहत्यांना तिला बघायची इच्छा आहे, त्यांच्यासाठी मी तिचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत राहीन. मी नकारात्मक लोकांच्या प्रतिक्रियांची किंवा मतांची काळजी करणार नाही.’
View this post on Instagram
शेफाली अंधेरीच्या लोखंडवाला संकुलात पती पराग त्यागीसह राहत होती. 27 जूनच्या रात्री 11 च्या सुमारास तिला हृदयविकाराचा झटका आला होता. उपचारासाठी शेफालीला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालयाने तिला मृत घोषित केलं. न्यायवैद्यक पथकाने शनिवारी सकाळी तिच्या निवासस्थानी भेट देऊन पाहणी केली. यावेळी रक्त आणि व्हिसेरा नमुने न्यायवैद्यक तपासणीसाठी जतन करण्यात आले होते.
