Parineeti Chopra : परिणीती चोप्रा रुग्णालयात दाखल, काय आहे कारण?
Parineeti Chopra : अभिनेत्री परिणीती चोप्राला दिल्लीतल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. काही दिवसांपूर्वीच ती दिल्लीला रवाना झाली होती. त्यानंतर आता तिला तातडीने रुग्णालयात दाखल केल्याची माहिती समोर येत आहे.

अभिनेत्री परिणीती चोप्राला दिल्लीतल्या रुग्णालयात दाखल केल्याची माहिती समोर येत आहे. ऐन दिवाळीत परिणीतीला रुग्णालयात का दाखल करावं लागलं, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. परंतु यामागे काळजी किंवा चिंता करण्याचं काही कारण नाही. परिणीती लवकरच आई होणार असून डिलिव्हरीसाठी तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यामुळे दिवाळीच्या मुहूर्तावर परिणीतीच्या कुटुंबात चिमुकल्या पाहुणा किंवा पाहुणीचं आगमन होणार आहे. चड्ढा कुटुंबीयांची दिवाळी यावर्षी आणखी खास होणार असल्याने नेटकरी त्यांच्यावर आतापासूनच शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.
‘पिंकविला’ या वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार, बाळाला जन्म देण्यासाठी परिणीती काही दिवसांपूर्वी दिल्लीला रवाना झाली होती. दिल्लीतच बाळाचं स्वागत करण्याची त्यांची प्लॅनिंग होती. त्यानुसार परिणीतीला तिथल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 25 ऑगस्ट 2025 रोजी परिणीती चोप्रा आणि तिचा पती राघव चड्ढाने चाहत्यांना गुड न्यूज सांगितली होतं. या दोघांनी 13 मे 2023 रोजी दिल्लीत साखरपुडा केला होता. या कार्यक्रमाला ‘आप’चे अरविंद केजरीवाल आणि भगवंत मान यांसारखे राजकीय नेतेसुद्धा उपस्थित होते. त्यानंतर त्याच वर्षी 24 डिसेंबर रोजी त्यांनी लग्न केलं. उदयपूरमध्ये धूमधडाक्यात त्यांनी डेस्टिनेशन वेडिंग केलं होतं.
View this post on Instagram
परिणीतीने लग्नानंतर अभिनयक्षेत्रात फारसं काम केलं नाही. इम्तियाज अली दिग्दर्शित ‘अमर सिंह चमकीला’ या चित्रपटात तिने दिलजीत दोसांझसोबत भूमिका साकारली होती. हा चित्रपट थिएटरमध्ये नव्हे तर थेट ओटीटीवर प्रदर्शित करण्यात आला होता.
राघव आणि परिणीती हे एकमेकांना युकेमध्ये असल्यापासून ओळखतात. परिणीतीने मँचेस्टर बिझनेस स्कूलमध्ये शिक्षण घेतलंय. तर राघवने लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्समधून शिक्षण पूर्ण केलंय. परिणीतीने 2011 मध्ये ‘लेडीज व्हर्सेस रिकी बहल’ या चित्रपटात सहाय्यक अभिनेत्रीची भूमिका साकारून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटातील तिच्या अभिनयाचं प्रेक्षक-समिक्षकांकडून कौतुक झालं. त्यानंतर ती ‘इशकजादे’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकली. अर्जुन कपूरसोबत तिची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच आवडली. परिणीतीने ‘शुद्ध देसी रोमान्स’, ‘हसी तो फसी’, ‘दावत ए इश्क’, ‘किल दिल’ यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.
