मी संतापाने धुमसतोय.., सहअभिनेत्रीनेच पैसे देऊन चालवलं ‘हेट कँपेन’? सेटवर जोरदार भांडणानंतर अभिनेत्याची पोस्ट
एकाच मालिकेत काम करणाऱ्या सहअभिनेत्रीने पैसे देऊन अभिनेत्याविरोधात हेट कँपेन चालवल्याची जोरदार चर्चा होत आहे. अभिनेता पार्थ समथान याने अखेर सोशल मीडियावर पोस्ट लिहित ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे.

‘सेहेर होने को है’ या मालिकेत भूमिका साकारणारे कलाकार पार्थ समथान आणि ऋषिता कोठारी यांच्यातील वाद आता विकोपाला गेला आहे. या दोघांनी आता सोशल मीडियावर एकमेकांवर गंभीर आरोप केले आहेत. इतकंच नव्हे तर प्रचंड ट्रोलिंगला वैतागून पार्थने सोशल मीडियापासून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात त्याने पोस्टसुद्धा लिहिली आहे. सोशल मीडियावर त्याला आणि त्याच्या कुटुंबीयांना इतकं ट्रोल केलं जातंय, की त्या नकारात्मकतेचा त्याच्यावर खूप परिणाम होऊ लागला आहे. पार्थने इन्स्टाग्रामवर लिहिलेल्या पोस्टमध्ये आरोप केला आहे की पैसे देऊन ‘बॉट’द्वारे ही ट्रोलिंग केली जात आहे. त्याची ही पोस्ट वाचून चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. त्याच्या या पोस्टनंतर अभिनेत्री ऋषिता कोठारी आणि तिचा बॉयफ्रेंड मृदुल मीना मिळून त्याला लक्ष्य करत असल्याचा अंदाज काहींनी वर्तवला आहे.
‘मी नेहमीच शांत आणि सकारात्मक राहणारा मुलगा आहे. परंतु नुकतंच माझ्या निदर्शनास आलं की कोणतीही बॉट अकाऊंट खरेदी करून सोशल मीडियावर माझ्याबद्दल, माझ्या कुटुंबीयांबद्दल आणि खासगी आयुष्याबद्दल नकारात्मक गोष्टी लिहित आहेत. फेक अकाऊंट्सवरून हे सगळं करण्यात येत असून यामुळे मला खूप मोठा धक्का बसला आहे. ते कमेंट्स वाचून माझ्यातील राग धुमसतोय. या सगळ्या गोष्टींमागे कोणती व्यक्ती आहे, याचा अंदाज मला आला आहे. पण नाव घेण्यात आता काही अर्थ नाही. त्यामुळे मी सोशल मीडियापासून काही वेळ ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. सायबर क्राइम डिपार्टमेंटकडे तक्रारी करून माझी ऊर्जा मी आणखी घालवू शकत नाही. त्यापेक्षा मी माझ्या आयुष्यावर लक्ष केंद्रीत करेन’, अशी पोस्ट पार्थने लिहिली आहे.
पार्थची पोस्ट-

‘इंडिया फोरम्स’च्या एका रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, गेल्या काही काळापासून पार्थला सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. त्याला ट्रोल करण्यासाठी बॉट्सचा वापर केला जात असल्याचा संशय त्याला होता. कोणीतरी यासाठी पैसे देत असल्याचाही त्याने आरोप केला. मिळालेल्या माहितीनुसार, पार्थने या प्रकरणी थेट सेटवर ऋषिताशी बोलण्याचा निर्णय घेतला. परंतु त्यांच्या संवादाचं रुपांतर लगेचच वादात झालं. या वादामुळे सेटवरील वातावरण पूर्णपण बिघडलं होतं, ज्यामुळे निर्मात्यांनाही शूटिंग थांबवावं लागलं होतं.
