Photo Prem : ‘फोटो प्रेम’ करणार प्रेक्षकांचं भरभरुन मनोरंजन; नीना कुलकर्णी मुख्य भूमिकेत

'फोटो प्रेम' या आगामी डायरेक्ट टू स्ट्रीम मराठी चित्रपटाचा प्रीमिअर 7 मे रोजी करण्यात येणार आहे. ('Photo Prem' will entertain the audience to the fullest; Neena Kulkarni in the lead role)

Photo Prem : 'फोटो प्रेम' करणार प्रेक्षकांचं भरभरुन मनोरंजन; नीना कुलकर्णी मुख्य भूमिकेत


मुंबई: सध्या ओटीटीमुळे आपलं चांगलं मनोरंजन होत आहे. त्यामुळे याच माध्यमातून आता नवा मराठी चित्रपट आपल्या भेटीला येणार आहे. अर्थात ‘फोटो प्रेम’ (Photo Prem) या आगामी डायरेक्ट टू स्ट्रीम मराठी चित्रपटाचा प्रीमिअर भारतात 7 मे रोजी करण्यात येणार आहे.

सोबतच या चित्रपटाचा ट्रेलरही प्रदर्शित करण्यात आलाय. या चित्रपटात दिग्गज अभिनेत्री नीना कुलकर्णी यांची मध्यवर्ती भूमिका आहे त्याचप्रमाणे अमिता खोपकर आणि समीर धर्माधिकारी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

‘माई’ या व्यक्तिरेखेची कथा

‘फोटो प्रेम’ ही ‘माई’ या व्यक्तिरेखेची कथा आहे. आपल्या ‘जुन्या फोटो’मध्ये आपण तितकेसे छान दिसत नसल्यामुळे आपल्या मृत्यूनंतर सर्वांना आपला विसर पडेल याची माईला चिंता असते. माईची कॅमेऱ्याची भीती घालविण्याचा आणि शेवटी या भीतीवर मात करून परफेक्ट फोटो काढण्यापर्यंतचा हा प्रवास या चित्रपटात दाखविण्यात आला आहे. ‘फोटो प्रेम’ या चित्रपटाची निर्मिती आदित्य राठी, मेहुल शहा आणि गायत्री पाटील यांची आहे आणि आदित्य राठी व गायत्री पाटील या दोघांनी चित्रपट संयुक्तपणे लिहिला आणि दिग्दर्शित केला आहे.

परफेक्ट फोटो काढण्यासाठी माईचा उत्कंठावर्धक प्रवास

या ट्रेलरमध्ये माईच्या आयुष्याची झलक दिसते. माई एका मृत व्यक्तीचा लहानपणीचा फोटो पाहून चिंतीत होताना दिसते. तिचे अलीकडील फारसे फोटो उपलब्ध नसल्यानं तिच्या मृत्यूनंतर लोक तिला कसे लक्षात ठेवतील, याचा ती विचार करू लागते. त्यानंतर एक परफेक्ट फोटो काढण्यासाठी माईचा उत्कंठावर्धक प्रवास सुरू होतो.

नीना कुलकर्णींनी व्यक्त केल्या भावना

दिग्गज कलाकार आणि मध्यवर्ती भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री नीना कुलकर्णींनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत, “’फोटो प्रेम’ ही अत्यंत बारकावे टिपणारी आणि विचार करायला लावणारी कथा आहे आणि या चित्रपटातील मध्यवर्ती भूमिका निभावता येणे हे कोणत्याही बहुमानापेक्षा कमी नाही. या चित्रपटात एक निरागस आणि विशुद्ध भावना दर्शविण्यात आली आहे आणि या व्यक्तिरेखेला न्याय देण्याचा मी पूर्ण प्रयत्न केला आहे. ‘फोटो प्रेम’ या चित्रपटातील माईची गोष्ट शक्य तितक्या विस्तृत पातळीवर दाखविली गेली पाहिजे. हा चित्रपट सर्वांना पाहावा असा आहे आणि ज्या प्रेमाने आम्ही हा चित्रपट तयार केला तेवढेच प्रेक्षकांचेही प्रेम या चित्रपटाला लाभेल, अशी मला आशा आहे.”असं त्या म्हणाल्या आहेत.

संबंधित बातम्या

Photo : गोपी बहू अर्थात देवोलीना भट्टाचार्यचा कातिलाना अंदाज, पाहा फोटो

Photo : मृत्यूच्या अफवेनंतर मीनाक्षी शेषाद्रीने शेअर केले फोटो, तुम्ही पाहिलेत?