सैफ अली खानवरील हल्ला प्रकरणी पोलिसांच्या हाती लागले महत्त्वाचे पुरावे
अभिनेता सैफ अली खानवरील हल्ला प्रकरणी पोलिसांच्या हाती आणखी काही महत्त्वपूर्ण पुरावे लागले आहेत. आरोपीची कसून चौकशी करण्यासाठी पोलीस त्याची कोठडी वाढवून मागू शकतात. या प्रकरणात एकापेक्षा अधिक आरोपींचा सहभाग असल्यचा संशय पोलिसांना आहे.

अभिनेता सैफ अली हल्ला प्रकरणात पोलिसांच्या हाती आणखी पुरावे लागले आहेत. सैफवर चाकूहल्ला करणाऱ्या आरोपीचे बूट जप्त करण्यात आले आहेत. आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद उर्फ विजय दासने गुन्ह्याच्या वेळी घातलेले बूट पोलिसांनी जप्त केले आहेत. यापूर्वी हल्ल्यात वापरलेला चाकूचा तुकडा आणि कपडे पोलिसांनी जप्त केले होते. शरीफुलच्या कपड्यांवर रक्ताचे डाग असून ते न्यायवैद्यक चाचणीसाठी पाठवण्यात आले आहेत. तसंच आरोपी बांगलादेशाचा नागरिक असल्याचं ओळखपत्र आणि चालक परवाना यापूर्वीच पोलिसांच्या हाती लागले होते. या प्रकरणात आणखी आरोपींचा सहभाग असल्याचा संशय असून त्याबाबत पोलीस तपास करत आहेत.
सैफवरील हल्ला प्रकरणात एकापेक्षा अधिक आरोपींचा सहभाग असल्याचा संशय मुंबई पोलिसांना आहे. शनिवारी एका पोलीस अधिकाऱ्याने याबद्दलची माहिती दिली. सैफच्या वांद्रे इथल्या राहत्या घरात 16 जानेवारी रोजी मध्यरात्री दोन वाजता आरोपीने सैफवर हल्ला केला. एक कोटी रुपयांची मागणी करत त्याने सैफवर चाकूहल्ला केला होता. यावेळी त्याने सैफवर सहा वार केले, त्यापैकी दोन वार गंभीर होते. सैफच्या मणक्याजवळ अडीच इंचाचा चाकूचा तुकडादेखील रुतला होता. सैफवर न्यूरोसर्जरी आणि प्लास्टिक सर्जरी करण्यात आली. आरोपी शरीफुलला कोर्टाने 29 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. चौकशीदरम्यान शरीफुल सहकार्य करत नसल्याची तक्रारसुद्धा पोलिसांनी केली आहे.
सैफ अली खानच्या रक्ताचे नमुने, कपडे पोलिसांनी गोळा केले आहेत. सैफच्या कपड्यावरील रक्ताचे नमुने हे शरीफुलच्या कपड्यांवरील रक्ताच्या नमुन्यांशी जुळतात का, याचा तपास पोलीस करणार आहेत. सैफच्या घरातील फिंगरप्रिंट्स हे आरोपीच्या फिंगरप्रिंट्सशी मॅच झाले आहेत. शुक्रवारी सैफने पोलिसांकडे त्याचा जबाब नोंदवला होता. यावेळी त्याने घडलेली संपूर्ण घटना पोलिसांना सांगितली.
सैफ अली खानवर चोरट्याने चाकू हल्ला केल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून सैफ आणि त्याची पत्नी करिना या दोघांनाही मुंबई पोलिसांनी सुरक्षा पुरवली आहे. याशिवाय सैफ राहत असलेल्या इमारतीची खासगी सुरक्षाही वाढवण्यात आली आहे. हल्ल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून सैफ आणि करीना यांच्या सुरक्षेसाठी प्रत्येकी एक पोलीस शिपाई तैनात करण्यात आला आहे. त्यानंतर त्यांच्या सुरक्षेबाबत आढावा घेऊन त्यांना सुरक्षा पुरवण्यात येईल, असं अधिकाऱ्याने सांगितलं.
