‘धुरंधर’चे कार्यकारी निर्माते राहुल गांधी? ओपनिंग क्रेडीट पाहून चक्रावले नेटकरी, काय आहे सत्य?
'धुरंधर'च्या श्रेयनामावलीत राहुल गांधी हे नाव वाचून प्रेक्षक चक्रावले आहेत. याचा स्क्रीनशॉट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. त्यावर नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहेत. हे कोणत्या क्षेत्रात तुम्ही आलात, असा खोचक सवाल नेटकरी राहुल गांधींना करत आहेत.

रणवीर सिंह, अक्षय खन्ना, अर्जुन रामपाल, आर. माधवन, संजय दत्त, सारा अर्जुन यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका असलेला ‘धुरंधर’ हा बॉलिवूडमधील ब्लॉकबस्टर चित्रपट ठरतोय. आतापर्यंत या चित्रपटाने भारतात 250 आणि जगभरात तब्बल 350 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली आहे. कमाईचा हा आकडा फक्त प्रदर्शनाच्या आठ दिवसांतला आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन, त्यातील कलाकार, दृश्ये, कथानक या सर्वांचं प्रेक्षक-समिक्षकांकडून कौतुक होत आहे. परंतु अशातच या चित्रपटाच्या सुरुवातीला दाखवलेल्या श्रेयनामावलीतील एका नावाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. या चित्रपटाच्या कार्यकारी निर्मात्यांचं नाव वाचून प्रेक्षक चक्रावले आहेत.
‘धुरंधर’चे कार्यकारी निर्माते राहुल गांधी?
‘धुरंधर’च्या ओपनिंग क्रेडीट्समध्ये कार्यकारी निर्माता म्हणून ‘राहुल गांधी’ हे नाव वाचून प्रेक्षकांचा आश्चर्याचा धक्काच बसला आहे. याचा स्क्रीनशॉट सध्या एक्सवर (ट्विटर) तुफान व्हायरल होत आहे. हे नाव वाचून नेटकरी गोंधळून गेले आहेत. कार्यकारी निर्माते हे काँग्रेस सदस्य आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधीच आहेत का, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. त्यावर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रियासुद्धा दिल्या आहेत. ‘भाईसाहेब, हे कोणत्या क्षेत्रात आले’, असा सवाल एकाने केला. तर ’99 निवडणुका हरल्यानंतर राहुल गांधीजींच्या कारकिर्दीत मोठा बदल’, असं दुसऱ्याने लिहिलं.
नेमकं काय आहे सत्य?
‘धुरंधर’च्या ओपनिंग क्रेडिट्समध्ये दिसणाऱ्या राहुल गांधी या नावामागचं सत्य वेगळंच आहे. धुरंधरच्या सुरुवातीच्या श्रेयनामावलीत उल्लेख केलेल्या राहुल गांधींचा राजकारणाशी काहीही संबंध नाही. राहुल गांधी या नावाचे ज्येष्ठ निर्माते बॉलिवूड इंडस्ट्रीत असून ते हिंदी चित्रपटसृष्टीशी दीर्घकाळापासून जोडलेले आहेत. त्यांनी यापूर्वी ‘रुस्तम’, ‘मुंबई डायरीज’, ‘रॉकेट बॉईज’, ‘फर्जी’, ‘द फॅमिली मॅन’, ‘लकी भास्कर’ यांसारख्या यशस्वी चित्रपट आणि वेब सीरिजची निर्मिती केली आहे.
‘धुरंधर’ या चित्रपटाचा दुसरा भाग ‘धुरंधर 2 : द रिव्हेंज’ पुढच्या वर्षी ईद-उल-फित्रच्या मुहूर्तावर 19 मार्च 2026 रोजी प्रदर्शित होणार आहे. या स्पाय थ्रिलर चित्रपटाचं लेख, सहनिर्मिती आणि दिग्दर्शक आदित्य धरने केलं आहे. मल्टिस्टारर चित्रपट असूनही प्रत्येक भूमिकेला यात समान न्याय मिळाला आहे. या चित्रपटाने आतापर्यंत जगभरात तब्बल 372.75 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
