Video: 30 वर्षानंतर राज ठाकरे आणि सोनाली बेंद्रेची भेट, सोशल मीडियावर व्हिडीओची चर्चा
सोशल मीडियावर मनसे प्रमुख राज ठाकरे आणि अभिनेत्री सोनाली बेंद्रे यांच्या 30 वर्षानंतरच्या भेटीच्या व्हिडीओला पसंती मिळत असल्याचे दिसत आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दादरच्या छत्रपती शिवाजी पार्क मैदानात अभिजात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त एक कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला मनोरंजन चित्रपटसृष्टीमधील काही दिग्गजांनी हजेरी लावली होती. त्यामध्ये ज्येष्ठ अभिनेते जावेद अख्तर, आशा भोसले, सोनाली बेंद्रे, शर्वरी वाघ आणि इतर काही मंडळींचा समावेश आहे. पण बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रेच्या उपस्थितीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. कारण मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि सोनाली बेंद्रे यांची खूप जुनी मैत्री आहे. जवळपास ३० वर्षानंतर या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांची पुन्हा भेट झाल्याचे म्हटले जात आहे.
मुंबईत पहिल्यांदा मायकल जॅक्शनच्या कार्यक्रमाचे १९९६ साली आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात राज ठाकरे आणि सोनाली बेंद्रे एकत्र दिसले होते. त्यानंतर आता जवळपास ३० वर्षांनंतर पुन्हा एकदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यक्रमात दोघांनी एकत्र हजेरी लावली आहे. सोशल मीडियावर दोघांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओला चांगली पसंती मिळत असल्याचे दिसत आहे. तसेच इतक्या वर्षानंतरही सोनाली आणि राज ठाकरे यांच्यामध्ये आजही चांगली मैत्रीचे असल्याचे नेटकरी म्हणत आहेत.
View this post on Instagram
काय आहे व्हिडीओ?
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे देखील दिसत आहेत. अभिजात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या काव्य वाचन सोहळ्यात सोनाली बेंद्रेची उपस्थिती सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. सोनाली, शर्मिला ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या या कार्यक्रमात चांगल्या गप्पा रंगल्या होत्या. त्यानंतर शर्वरी वाघ, जावेद अख्तर, सोनाली बेंद्रे हे व्यासपीठावर जात असतानाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये सोनाली राज ठाकरेंना इशारा करत असल्याचे कॅमेरामध्ये टिपले गेले आहे.
View this post on Instagram
सोनालीने केले मराठीत भाषण
सोनालीने या कार्यक्रमात मराठी भाषेत भाषण केले आहे. ‘नमस्कार! आज इथे महाराष्ट्राच्या अनेक दिग्गज व्यक्तींसमोर मी उभी आहे. माझी गणना इथे होणं ही माझ्यासाठी प्रतिष्ठेची बाब आहे. पण सुरुवातीलाच मी एक कबुली देते. मी स्वत:ला अस्सल महाराष्ट्रीय म्हणायला थोडीशी संकोचते. कारण माझा जन्म जरी बेद्रेंची सोनाली म्हणून झाला असला तरी माझे वडील कायम महाराष्ट्राबाहेर पोस्टिंगवर असल्यामुळे माझं संपूर्ण बालपण भारतभर फिरण्यामध्ये गेलं. आम्ही इतक्या वेळा घरं बदलली की घरचा पत्ता पूर्ण लिहिण्याच्या आधी आम्ही पुढच्या शिफ्टिंगचा विचार करायचो. पण या सगळ्यात एक गोष्टीत कोणतीही तडजोड नव्हती ती म्हणजे आमच्या घरातला मराठी बाणा. कुठेही राहिलो, कितीही भाषा शिकल्या, कुठल्याही वेगवेगळ्या भाषेचे मित्रमैत्रिणी झाले तरी आमच्या घरात मात्र मराठीच बोललं जायचं. त्यामुळे १०० टक्के महाराष्ट्रीयन म्हणू शकत नसले तरीही मराठी ही माझ्यासाठी घर आहे’ असे सोनाली म्हणाली.
