
9 कोटी रुपयांचं कर्ज आणि चेक बाऊन्स प्रकरणी प्रसिद्ध अभिनेता राजपाल यादव जवळपास 13 दिवस तिहार तुरुंगात राहिल्यानंतर जामिनावर बाहेर पडला आहे. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर राजपाल त्याच्या चेक बाऊन्स प्रकरणाविषयी बऱ्याच गोष्टी उघडकीस आणताना दिसत आहे. कशाप्रकारे मनमानी पद्धतीने करार वाढवला गेला आणि चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या वेळी मोठी रक्कम द्यावी लागली, हे राजपालने स्पष्ट केलं. यासाठी त्याने युट्यब चॅनलचा आधार घेतला आहे. आपल्या अधिकृत युट्यूब चॅनलवर राजपालने व्हिडीओ पोस्ट केला असून त्यात त्याने त्याच्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत. या व्हिडीओंना युट्यूबवर जबरदस्त व्ह्यूज मिळत आहेत. राजपालने फक्त दोन व्हिडीओ पोस्ट केले असले तरी आता त्याच्या चॅनलच्या सबस्क्राइबर्सची संख्या चांगलीच वाढत आहे.
माझ्या गावातील वडिलोपार्जित घर 5 कोटी रुपयांच्या विटांवर बांधलं गेलं आहे आणि 50 कोटी रुपयेसुद्धा मला कमकुवत करू शकत नाहीत, असं तो या व्हिडीओत म्हणाला आहे. राजपालने स्पष्ट केलं की पहिला करार 2012 मध्ये झाला होता आणि 5 कोटी रुपयांच्या कर्जाच्या बदल्यात 8 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर पैसे परत करण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. परंतु जेव्हा पुढच्याच वर्षी चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार होता, तेव्हा प्रदर्शनाला विलंब करून 11 कोटी रुपयांची मागणी करणारा दुसरा करार पाठवण्यात आला.
याविषयी राजपाल पुढे म्हणाला, “चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर पैसे परत करण्याचं मान्य करण्यात आलं होतं, परंतु चित्रपटाच्या प्रदर्शनाला विलंब झाल्यानंतर दुसऱ्या करारात रक्कम वाढवण्यात आलं होतं. दुसऱ्या करारात म्हटलं गेलं की जर तू वेळेवर पैसे परत केले तर मी 7 कोटी रुपये घेईन, परंतु सध्या 11 कोटी रुपयांवर तोडगा काढुयात. ज्यांनी कर्ज दिलं, त्यांनी काही मुलाखती दिल्यानंतर माझा चित्रपट फ्लॉप झाला, कारण तोपर्यंत सर्वत्र माझ्यावर फसवणुकीचे आरोप झाल्याचं वृत्त प्रकाशित झालं होतं. माझा चित्रपट जवळपास 2500 स्क्रीन्सवर प्रदर्शित होणार होता, परंतु तो प्रत्यक्षात 1200 स्क्रीन्सवरच प्रदर्शित झाला. थिएटर मालकांनी मला नकार दिला.”
राजपाल यादवने तुरुंगातून सुटल्यानंतर 28 फेब्रुवारी रोजी त्याचं युट्यूब चॅनल सुरू केलं. त्यानंतर त्याने फक्त दोन व्हिडीओ पोस्ट केले आहेत. तरीसुद्धा त्याच्या चॅनेलचे सबस्क्राइबर्स 17.2 हजारांवर पोहोचले आहेत.