कायमच विचित्र मत मांडणारे राम गोपाल वर्मा हे ए. आर. रहमान यांच्या वादात मात्र पटेल असं बोलले
ए. आर. रहमान यांच्या बॉलिवूडमधील सांप्रदायिक भेदभावाच्या वक्तव्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. त्यांच्या या वक्तव्याचा अनेकांनी निषेध केला. आता दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनीसुद्धा त्यांचं मत मांडलं आहे. ते नेमकं काय म्हणाले, ते सविस्तर वाचा..

‘ऑस्कर’, ‘गोल्डन ग्लोब’ यांसारखे प्रतिष्ठित पुरस्कार पटकावणारे संगीतकार आणि गायक ए. आर. रहमान हे गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. एका मुलाखतीत त्यांनी बॉलिवूड इंडस्ट्रीबद्दल जे वक्तव्य केलं, त्यावरून हा वाद निर्माण झाला आहे. रहमान यांनी या मुलाखतीत विकी कौशलच्या ‘छावा’ या चित्रपटाला फूट पाडणारा असं म्हटलं होतं. त्याचसोबत बॉलिवूडमधील पॉवर शिफ्ट, सांप्रदायिकता यांवरही त्यांनी टिप्पणी केली. गेल्या आठ वर्षांत मला बॉलिवूडमध्ये काम मिळालं नसल्याचा खुलासा रहमान यांनी या मुलाखतीत केला होता. यासाठी त्यांनी बॉलिवूड इंडस्ट्रीतील सांप्रदायिक भेदभावाला कारणीभूत ठरवलं होतं.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत राम गोपाल वर्मा म्हणाले, “मी त्यांच्या सांप्रदायिकवाल्या गोष्टीवर कोणतीही प्रतिक्रिया देऊ इच्छित नाही. कारण मला त्यात काही सत्य आढळलं नाही. मला तर असं वाटतं की फिल्म इंडस्ट्रीत फक्त पैसे कमावण्याविषयी बोललं जातं. जो कोणी त्यांना पैसा मिळवून देतो, ते त्यांच्याच मागे लागतात. जात, धर्म किंवा तुम्ही कुठून आहात, या सर्व गोष्टींनी काही फरक पडत नाही. जर दाक्षिणात्य दिग्दर्शिक चित्रपट ब्लॉकबस्टर बनवत आहेत, तर लोक त्यांच्याकडे जातील.” यावेळी त्यांनी गायक एसपी बालसुब्रहमण्यम यांचं उदाहरण दिलं, ज्यांनी हिंदी सिनेसृष्टीत आपली वेगळी ओळख बनवली होती.
“जेव्हा दिग्दर्शक सूरज बडजात्या यांनी एसपी बालसुब्रहमण्यम यांना ‘मैंने प्यार किया’ आणि ‘हम आपके है कौन’साठी साइन केलं होतं, तेव्हा त्या चित्रपटातील गाणी जबरदस्त हिट झाली होती. यामुळेच त्यांनी त्यांची निवड केली होती. त्यांच्यानंतर इतर गाणी फारशी चालली नाहीत. गायक हिंदीतला असो, तेलुगू भाषेतला असो किंवा तमिळचा असो.. याने काहीच फरक पडत नाही”, असं मत राम गोपाल वर्मा यांनी मांडलं. रहमान यांनी ते वक्तव्य कदाचित वैयक्तिक अनुभवांमधून केलं असावं, असंही ते पुढे म्हणाले.
“तरीही मी रहमान यांच्या वतीने बोलू शकत नाही, कारण त्यांच्यासोबत काय घडलं हे मला माहीत नाही. आपल्यापैकी कोणीही सामान्य गोष्टींबद्दलच बोलू शकतं. परंतु एखाद्याने अशी विशिष्ट घटना अनुभवली असेल, ज्यामुळे ते असं बोलत असतील. त्यांच्यासोबत खरोखर असं काही घडलं आहे का, हे मला माहीत नाही. त्यामुळे मी त्यावर भाष्य करू शकत नाही”, असं वर्मा यांनी स्पष्ट केलं.
