Rashmika Mandanna-Vijay Deverakonda: ‘कॉफी विथ करण’नंतर तुफान ट्रोलिंग; अखेर रश्मिका-विजयने उचललं मोठं पाऊल
'कॉफी विथ करण' या चॅट शोमध्ये विजय देवरकोंडाने खुलासा केला की, रश्मिकाने त्याला लग्नासाठी शंभर वेळा विचारलं होतं. यावरून विजयला 'रेड फ्लॅग' म्हणत नेटकऱ्यांनी तुफान ट्रोलिंग केली. याप्रकरणी आता दोघांनी मोठं पाऊल उचललं आहे.

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय जोडी रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा सध्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहेत. नुकत्याच ‘कॉफी विथ करण’ या लोकप्रिय चॅट शोमध्ये दोघांनी त्यांच्या नात्याबद्दल आणि लग्नाबद्दल अनेक खुलासे केले. मात्र, या मुलाखतीनंतर सोशल मीडियावर त्यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं. आता या प्रकरणाला वेगळं वळण मिळालं असून, रश्मिका आणि विजय यांनी ऑनलाइन ट्रोलिंग, कथित खोट्या बातम्या आणि छेडछाड केलेल्या स्क्रीनशॉट्सविरोधात हैदराबादमधील सायबर क्राईम अधिकाऱ्यांकडे औपचारिक तक्रार दाखल केली आहे.
नेमकं प्रकरण काय?
रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांनी 21 ऑक्टोबर 2026 रोजी प्रसारित झालेल्या ‘कॉफी विथ करण’च्या नवव्या सिझनमध्ये हजेरी लावली होती. या कार्यक्रमात दोघांनी पहिल्यांदाच त्यांच्या नात्याबद्दल आणि लग्नाबद्दल मोकळेपणाने संवाद साधला. यावेळी रश्मिकाने विजयला लग्नासाठी जवळपास वर्षभर दररोज विचारल्याचा किस्साही सांगितला. या वक्तव्याची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. काही नेटकऱ्यांनी विजयच्या वागण्यावर टीका करत त्याला ‘रेड फ्लॅग’ म्हटलं. त्यानंतर दोघांच्या नात्याबद्दल विविध दावे आणि चर्चा सुरू झाल्या. त्यांच्या टीमच्या म्हणण्यानुसार, या टीकेदरम्यान कथित खोट्या माहितीचा प्रसार आणि दिशाभूल करणाऱ्या पोस्टही समोर आल्या.
रश्मिकाची पोस्ट-
View this post on Instagram
‘द इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्तानुसार, रश्मिका आणि विजय यांच्या टीमने हैदराबादमधील सायबर क्राईम अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. यामध्ये कथित बनावट मजकूर, बदल केलेले स्क्रीनशॉट्स, दुसऱ्याच्या नावाने केलेले अकाऊंट्स आणि लक्ष्य करून केल्या जाणाऱ्या ऑनलाइन छळाच्या प्रकारांची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणाशी संबंधित काही ऑनलाइन पोस्ट आणि डिजिटल कंटेटचे दुवे तसंच पुरावे अधिकाऱ्यांकडे सादर केल्याचं टीमने सांगितलं आहे. सोशल मीडियावर त्यांच्या विरोधात समन्वयाने किंवा पैसे देऊन मोहीम राबवण्यात आली आहे का, याचाही तपास व्हावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
या प्रकरणावर रश्मिकाने सोशल मीडियावर सविस्तर पोस्ट लिहून आपली भूमिका स्पष्ट केली. प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे; मात्र, मत व्यक्त करणं आणि खोट्या गोष्टी पसरवणं यात फरक असल्याचं तिने सांगितलं. आपल्या कुटुंबाबद्दल माहिती नसताना त्यांच्यावर टीका करणं चुकीचं असल्याचंही तिने स्पष्ट केलं. रश्मिकाने विजयसोबतच्या नात्याबद्दलही ठामपणे सांगितलं की, ती आपल्या वैवाहिक आयुष्यात आनंदी आहे. त्यांच्या नात्याचा अर्थ केवळ लग्नाच्या प्रस्तावांची संख्या किंवा निर्णय घेण्यासाठी लागलेला वेळ एवढाच नसल्याचं तिने नमूद केलं.
रश्मिकाच्या पोस्टनंतर विजयनेही सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली. रश्मिका आपली सर्वात चांगली मैत्रीण आणि पत्नी असल्याचं सांगत त्याने त्यांच्या नात्याबद्दल आनंद व्यक्त केला. टीकेच्या पार्श्वभूमीवर, आम्ही दोघं एकमेकांच्या सोबत ठामपणे उभं असल्याचा संदेशही त्याने दिला.
