लिहिलेलं पुसता येतं पण..; विलासराव देशमुखांवरून रितेशचं रवींद्र चव्हाण यांना सडेतोड प्रत्युत्तर
अभिनेता रितेश देशमुखने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट करत भाजपचे आमदार रवींद्र चव्हाण यांना प्रत्युत्तर दिलं आहे. लातूरमधल्या मेळाव्यात रवींद्र चव्हाण यांनी विलासराव देशमुख यांच्याबद्दल वक्तव्य केलं होतं. त्यानंतर रितेशने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी लातूरमध्ये कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात विलासराव देशमुख यांच्याबद्दल एक वक्तव्य केलं होतं. भाजप कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता लातूरमधून विलासराव देशमुखांच्या आठवणी पुसल्या जातील, यात शंका नाही, असं ते म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांकडून संताप व्यक्त केला जात होता. त्यावर आता विलासराव देशमुख यांचा पुत्र आणि अभिनेता रितेश देशमुखने प्रतिक्रिया दिली आहे. रितेशने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये दोन वाक्यांत त्याने रवींद्र चव्हाण यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाला रितेश?
“दोन्ही हात वर करून सांगतो, लोकांसाठी जगलेल्या माणसांची नावं मनावर कोरलेली असतात. लिहिलेलं पुसता येतं, कोरलेलं नाही”, असं त्याने हात जोडून म्हटलंय. महाराष्ट्राच्या मनामनात साहेब.. असं कॅप्शन देत त्याने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. रितेशच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘हो दादा विलासराव देशमुख साहेबांचं नाव प्रत्येकाच्या मनात कोरलेलं आहे,’ असं एकाने लिहिलं. तर ‘खरं आहे दादा.. कोणी काही मिटवू शकत नाही’ असं दुसऱ्या युजरने म्हटलंय.
View this post on Instagram
लातूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रवींद्र चव्हाण हे भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यासाठी लातूरला गेले होते. त्यावेळी त्यांनी काँग्रेसचे दिवंगत नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याबद्दल हे वक्तव्य केलं होतं. याच कार्यक्रमात महापालिका निवडणुकीसाठीचा भाजपचा जाहीरनामा रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आलं होतं. यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना ते म्हणाले, “कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून लक्षात येतंय की लातूर शहरातून विलासराव देशमुखांच्या आठवणी पुसल्या जातील, यात काही शंका नाही.” त्यांच्या या वक्तव्यानंतर काँग्रेसमधून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. मेळावा संपल्यानंतर मात्र रवींद्र चव्हाण यांनी माध्यमांशी कोणताही संवाद साधला नव्हता. त्यांनी तिथून लगेच निघून जाणं पसंत केलं होतं. आता त्यांच्या वक्तव्यावर रितेश देशमुखची प्रतिक्रिया चर्चेत आली आहे.
याआधी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीसुद्धा प्रतिक्रिया दिली होती. “विलासराव देशमुख साहेबांच्या आठवणी लातूर जिल्ह्यातून पुसू शकणारा अजून कोणी निर्माण झाला नाही. अनेकजण इच्छा बाळगून आले आहेत, पण स्वाभिमानी लातूरकरांनी त्यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे”, असं ते म्हणाले होते.
