माझा भाऊ, फोन करावंसं वाटलं तितक्यात..; जिवलग मित्राच्या निधनानंतर रितेश देशमुखची भावूक पोस्ट
अभिनेता रितेश देशमुखने सोशल मीडियावर अत्यंत भावूक पोस्ट लिहिली आहे. आपल्या जिवलग मित्राच्या निधनानंतर त्याने या पोस्टद्वारे भावना व्यक्त केल्या आहेत. माझ्या भावा.. तू दुर्मिळ रत्न होतास.. असं रितेशने म्हटलंय.

सर्वोच्च न्यायालयाचे वकील सिद्धार्थ शिंदे यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. ते 48 वर्षांचे होते. दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सिद्धार्थ शिंदे हे माजी केंद्रीय कृषीमंत्री अण्णासाहेब शिंदे यांचे नातू होते. अभिनेता रितेश देशमुखसोबत त्यांची खूप खास मैत्री होती. आपल्या जिवलग मित्राच्या निधनाच्या वृत्ताने रितेशला मोठा धक्का बसला आहे. याविषयी त्याने सोशल मीडियावर अत्यंत भावूक पोस्ट लिहिली आहे. रितेशच्या आगामी ‘राजा शिवाजी’ या चित्रपटात सिद्धार्थ यांनी छोटी भूमिकासुद्धा साकारली आहे. काही महिन्यांपूर्वीच त्याचं शूटिंग पार पडलं होतं. या शूटिंगदरम्यानचे फोटोसुद्धा रितेशने शेअर केले आहेत.
रितेश देशमुखची पोस्ट-
या पोस्टमध्ये रितेशने म्हटलंय, ‘हे लिहिताना माझं मन खूप भरून आलंय. सिद्धार्थ शिंदे, माझा प्रिय शाळेतील वर्गमित्र आणि सर्वोच्च न्यायालयाचा ज्येष्ठ वकील. खूप दयाळू, नम्र, चेहऱ्यावर नेहमीच हास्य आणि कायम पाठिंबा देणारा होता. सहा वर्षांपूर्वी जेव्हा त्याने ऐकलं की मी छत्रपती शिवाजी महाराजांवर चित्रपट बनवतोय, तेव्हा त्याने मला अत्यंत आनंदाने फोन केला. रितेश, कृपया मला ‘राजा शिवाजी’चा एक भाग बनू दे, स्क्रीनवर जरी ती अगदी छोटीशी भूमिका का असेना, असं तो म्हणाला. शिवरायांसाठी असलेलं त्याचं ते प्रेम होतं.’
My heart is heavy as I share this. Siddharth Shinde, my dear school classmate and a senior Supreme Court advocate , was a soul so kind, so humble, always there with a warm smile and unwavering support. Six years ago, when he heard I was making a film on our beloved Chhatrapati… pic.twitter.com/wfJRbmtsJh
— Riteish Deshmukh (@Riteishd) September 16, 2025
‘काही महिन्यांपूर्वीच, आम्ही संजय दत्त सरांसोबत शूटिंगमध्ये दोन सुंदर दिवस घालवले. त्याच्या उपस्थितीमुळे सेट जणू उजळून निघालं होतं. आज जेव्हा मी त्याचा सीन एडिट करत होतो, तेव्हा ते किती अविश्वसनीय होतं हे पाहून हसत होतो. त्याच्यासोबत हा आनंद शेअर करण्यासाठी मी त्याला फोन करणार होतो. तितक्यात ही धक्कादायक बातमी आली की तो आता आपल्यात नाही. आम्ही एकत्र चित्रपट पाहतोय, हसतोय, आठवणी सांगतोय.. या कल्पनेनंच माझं अंत:करण जड झालंय. नियतीने काहीतरी वेगळीच योजना होती. सिद्धार्थ, माझा भाऊ.. तू दुर्मिळ रत्न होतास. तुझ्या कुटुंबीयांप्रती आणि जवळच्या व्यक्तीप्रती मी संवेदना व्यक्त करतो. तुझ्या आत्म्याला शांती लाभो. प्रिय मित्रा… आमच्या हृदयात तू कायम राहशील’, अशा शब्दांत रितेशने भावना व्यक्त केल्या आहेत.
