सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील सिद्धार्थ शिंदे यांचे निधन, न्यायालयीन क्षेत्रात हळहळ
प्रसिद्ध वकील सिद्धार्थ शिंदे यांचे निधन झाले. ४८ वर्षीय शिंदे हे सर्वोच्च न्यायालयात काम करत होते. त्यांच्या सोप्या आणि स्पष्टीकरणासाठी ओळखले जात होते. शिवसेना वाद आणि मराठा आरक्षणासारख्या प्रकरणांचे विश्लेषण ते सहजतेने सांगायचे. त्यांच्या निधनाने कायदेशीर क्षेत्रात मोठी हळहळ पसरली आहे.

सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील सिद्धार्थ शिंदे यांचे सोमवारी (१५ सप्टेंबर) अकस्मात निधन झाले. वयाच्या अवघ्या ४८ व्या वर्षी दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ते दिल्लीत प्रॅक्टिस करत होते. न्यायालयाचे क्लिष्ट भाषेतील निकाल सहजसोप्या शैलीत सर्वसामान्यांना समजणाऱ्या भाषेत सांगण्यासाठी ते ओळखले जायचे. त्यांच्या निधनाने न्यायालयीन वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात आहे.
नेमकं काय झालं?
सोमवारी सर्वोच्च न्यायालयात कामावर असतानाच सिद्धार्थ शिंदे यांना अचानक चक्कर आली. त्यानंतर त्यांना तातडीने दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करत त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. पण उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. सिद्धार्थ शिंदे हे माजी केंद्रीय कृषिमंत्री अण्णासाहेब शिंदे यांचे नातू होते.
कायदेशीर बाबींचे सोपे स्पष्टीकरण
सिद्धार्थ शिंदे हे त्यांच्या कायदेशीर ज्ञानासाठी आणि न्यायालयीन निर्णय सोप्या भाषेत समजावून सांगण्यासाठी परिचित होते. न्यायालयाची क्लिष्ट भाषा सामान्य माणसाला समजेल अशा पद्धतीने स्पष्ट करण्याची त्यांची शैली होती. ही शैली कायमच अनेकांसाठी उपयुक्त ठरली. शिवसेनेतील शिंदे विरुद्ध ठाकरे गट वादाच्या सुनावणीचे विश्लेषण ते सोप्या भाषेत मांडायचे. यासोबतच मराठा आरक्षणाचा मुद्द्यासह अनेक महत्त्वाच्या प्रकरणांचे विश्लेषण त्यांनी अतिशय सोप्या शब्दात केले होते. त्यांच्या निधनामुळे न्यायालयीन क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली असून, अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे.
पुण्यात अंत्यसंस्कार होणार
सिद्धार्थ शिंदे यांचे पार्थिव आज मंगळवार १६ सप्टेंबर रोजी दिल्लीहून पुण्यातील त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आले. दुपारी १ वाजता पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. त्यांच्या निधनाने न्यायालयीन क्षेत्रातील एक अभ्यासू आणि लोकाभिमुख व्यक्तिमत्व हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
दरम्यान सिद्धार्थ शिंदे हे मूळचे श्रीरामपूरचे रहिवासी असले तरी त्यांचे कुटुंब गेल्या अनेक वर्षांपासून पुण्यामध्ये स्थायिक झाले होते. त्यांचे वडील माजी आमदार आणि माजी मंत्री अण्णासाहेब शिंदे यांच्या कार्याचा वारसा त्यांनी जपला होता. वकील म्हणून त्यांची कारकीर्द खूप प्रभावी होती. ते केवळ कायद्याचे अभ्यासक नव्हते, तर कायद्यातील गुंतागुंतीच्या बाबी सामान्य जनतेला समजतील अशा सोप्या भाषेत मांडण्यात त्यांचा हातखंडा होता. अनेकदा, महत्त्वाच्या न्यायालयीन निर्णयांचे विश्लेषण त्यांनी केले आहे. अनेक संवेदनशील विषयांवरील सुनावणींचे निकाल समजावून सांगत असल्याने त्यांची प्रशंसा केली जायची.
