सलमान खानमुळे अरिजीत सिंहने गायनातून घेतली निवृत्ती? सोशल मीडियावर चर्चेला उधाण
प्रसिद्ध गायक अरिजीत सिंहने प्लेबॅक सिंगिंगमधून निवृत्ती घेतल्यानंतर आता सलमान खानला सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे. नुकतंच अरिजीतने सलमानच्या 'बॅटल ऑफ गलवान' चित्रपटातील 'मातृभूमी' हे गाणं गायलं होतं.

सुमधूर आवाज आणि सहज गायनाने कोट्यवधी लोकांच्या मनावर राज्य करणारा गायक अरिजीत सिंहने पार्श्वगायनातून निवृत्तीची घोषणा करताच सर्वांनाच मोठा धक्का बसला. त्याच्या निवृत्तीची बातमी फिल्म इंडस्ट्रीसोबतच चाहत्यांच्याही पचनी पडत नव्हती. अरिजीतने त्याच्या पोस्टमध्ये स्पष्ट केलं की तो संगीत निर्मिती करणं बंद करणार नाही, तर फक्त चित्रपटांमध्ये गाणं सोडून देणार आहे. त्याच्या या पोस्टने सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली आणि सर्वांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. अरिजीतचा हा निर्णय वैयक्तिक असला तरी सोशल मीडियावर असेही असंख्य पोस्ट व्हायरल होत आहे, ज्यामध्ये अभिनेता सलमान खानला जबाबदार ठरवलं जात आहे. सलमान आणि अरिजीत यांचा वाद फार जुना आहे. काही महिन्यांपूर्वी दोघांनी हा वाद मिटवला होता. त्यानंतर अरिजीतने सलमानच्या आगामी ‘बॅटल ऑफ गलवान’ या चित्रपटासाठी गाणंसुद्धा गायलं आहे.
सलमानच्या ‘बॅटल ऑफ गलवान’ या चित्रपटातील अरिजीतच्या आवाजातील ‘मातृभूमी’ हे गाणं नुकतंच प्रदर्शित झालं होतं. आता अरिजीतच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर युजर्स त्यावरून मीम्स व्हायरल करू लागले आहेत. ‘बॅटल ऑफ गलवान या चित्रपटातील ‘मातृभूमी’ हे गाणं कदाचित अरिजीतचं शेवटचं गाणं होतं, यानंतर त्याने निवृत्तीची घोषणा केली. अर्थात हे स्पष्ट आहे की अरिजीतच्या या निर्णयात सलमान खानची कोणतीच भूमिका नाही’, अशी उपरोधिक टिप्पणी युजर्सनी केली आहे.
Arijit Singh saw visuals of his last song and decided to retire 😭 pic.twitter.com/l2ksEnYkSN
— Ankit Pathak 🇮🇳 (@ankit_acerbic) January 27, 2026
‘मातृभूमी’ हे गाणं चार दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता. या गाण्याला हिमेश रेशमियाने संगीतबद्ध केलं आहे. सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत की सलमानच्या चित्रपटासाठी गाणं गायल्यानंतरच अरिजीतने इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेतला आहे. एका युजरने लिहिलं, ‘भाईसाठी (सलमान) एक गाणं आणि अरिजीतने निवृत्ती जाहीर केली. वयाच्या 60 व्या वर्षीही भाई लोकांचं करिअर संपवून टाकतो.’ तर दुसऱ्या नेटकऱ्याने म्हटलंय, ‘बॅटल ऑफ गलवानचं एक गाणं काय गायलं, अरिजीतने थेट टाटा-बाय बाय केलं.’ एक्स (ट्विटर) अकाऊंटवर सलमान खानला ट्रोल करणारे अनेक पोस्ट समोर आले आहेत. काही लोकांनी अशीही मस्करी केली की सलमानला त्याच्या गाण्यावर योग्य प्रकारे लिप-सिंक करताना पाहून अरिजीतने संपूर्ण फिल्मी करिअरपासूनच स्वत:ला दूर केलं.
Lip syncing so bad that Arijit chose to retire instantly after release of this song https://t.co/yY7QKfdUsF pic.twitter.com/2ZJKwS0r1E
— 𝙯 (@EvilByFate) January 27, 2026
अरिजीतसोबतच्या वादावर सलमानने ‘बिग बॉस’च्या मंचावर प्रतिक्रिया दिली होती. “अरिजीत आणि मी आता चांगले मित्र आहोत. आमच्यात थोडा गैरसमज झाला होता आणि तो गैरसमज माझ्याकडूनच झाला होता”, अशी जाहीर कबुली सलमानने दिली होती.
सलमान-अरिजीतमधला वाद
सलमान खान आणि अरिजीत सिंह यांच्यात 2014 मध्ये हा वाद सुरु झाला होता. एका पुरस्कार सोहळ्यात अरिजीतने सलमानला टोमणा मारला होता. त्या पुरस्कार सोहळ्यात सलमान खान आणि रितेश देशमुख सूत्रसंचालन करत असतात. ‘तू झोपला होतास का’, असा प्रश्न मंचावर अरिजीतला विचारल्यानंतर त्याने उत्तर दिलं, ‘तुम्ही झोपवलंत’. अरिजीतने अप्रत्यक्षपणे सलमान आणि रितेशच्या सूत्रसंचालनावर टीका केली होती. त्यानंतर सलमानच्या चित्रपटातून अरिजीतची गाणी काढून टाकण्यात आली होती. नंतर अरिजीतने जाहीररित्या सलमानची माफीसुद्धा मागितली होती.
