रेस्टॉरंटवरील गोळीबारानंतर कपिल शर्माने घेतला धसका; मुंबईतील घराबाहेरही वाढवली सुरक्षा
कॉमेडियन कपिल शर्माच्या कॅनडामधील रेस्टॉरंटचं 4 जुलै रोजी उद्घाटन झालं होतं. त्याच्या अवघ्या काही दिवसांतच या रेस्टॉरंटवर गोळीबार करण्यात आला. बुधवारी रात्री रेस्टॉरंटवर नऊ गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. सुदैवाने यात कोणीही जखमी झालं नाही.

कॉमेडियन आणि अभिनेता कपिल शर्माच्या कॅनडामधील रेस्टॉरंटवर खलिस्तानी दहशतवाद्यांनी बुधवारी रात्री गोळीबार केला. कारमध्ये बसलेल्या एका व्यक्तीने ‘कॅप्स कॅफे’वर किमान नऊ गोळ्या झाडल्या. काही दिवसांपूर्वीच कपिलच्या या रेस्टॉरंटचं उद्घाटन झालं होतं. या घटनेनंतर आता कपिलच्या मुंबईतील घराची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. बाबर खालसा इंटरनॅशनल ग्रुपशी संबंधित हरजीत सिंग लड्डीने कॅनडामधील रेस्टॉरंटच्या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. कपिल शर्माकडे वैयक्तिक सुरक्षा रक्षक असला तरी, खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई पोलिसांनी त्याच्या घरी आणि फिल्म सिटीच्या सेटवर सुरक्षा वाढवली आहे.
अंधेरीच्या पॉश परिसरात असलेल्या इमारतीत कपिल शर्माचं घर आहे. कपिल शर्मा त्याच्या कुटुंबासह नवव्या मजल्यावर राहतो. शुक्रवारी मुंबई पोलिसांची एक टीम त्याच्या घरी पोहोचली होती. कपिलच्या इमारतीत येणाऱ्यांचीही विशेष तपासणी केली जात आहे. पूर्वपरवानगी घेतल्यानंतरच त्यांना आत जाण्याची परवानगी दिली जातेय. कॅनडामधील कपिल शर्माच्या कॅफेवर गोळीबार झाल्यानंतर आता मुंबई पोलीस सतर्क झाले आहेत.
मुंबई पोलिसांचं एक पथक त्याच्या घरी पोहोचलं आणि त्यांनी सर्व गोष्टींचा आढावा घेतला. तसंच, इमारतीच्या सुरक्षेला सतर्क करण्यात आलं आहे. आत येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची माहिती घ्यावी आणि परवानगीशिवाय त्याला आत सोडू देऊ नये, असं पोलिसांनी सांगितलं आहे. कॅनडामधील हल्ल्याची जबाबदारी खलिस्तानी दहशतवादी संघटना खालसा इंटरनॅशनल ग्रुपने स्वीकारली आहे. पोलिसांव्यतिरिक्त कपिल शर्माकडे स्वत: ची खासगी बाऊन्सर्सची मोठी टीम आहे.
View this post on Instagram
4 जुलै रोजी कपिल शर्माचा ‘कॅप्स कॅफे’ ब्रिटीश कोलंबियातील सरे भागात उघडण्यात आला होता. बुधवारी रात्री त्याच्या कॅफेवर झालेल्या गोळीबारात सुदैवाने कोणी जखमी झालेलं नाही. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, लड्डी हा दहशतवादविरोधी एजन्सी एनआयएच्या मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांपैकी एक आहे. तो बब्बर खालसा इंटरनॅशनलशी संबंधित आहे. कपिलने याआधी केलेल्या एका वक्तव्याच्या नाराजीतून त्याने गोळीबाराचे आदेश दिल्याचं म्हटलं जातंय.
सोशल मीडियावरील पोस्टमध्ये लड्डीने म्हटलंय की, कपिल शर्माच्या कॉमेडी शोमधील एका भागात एका पात्राने निहंग शिखांच्या पोशाख आणि वर्तनाबद्दल काही विनोदी टिप्पणी केली होती. ज्यामुळे त्यांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या होत्या. विनोदाच्या नावाखाली कोणत्याही धर्माची किंवा अध्यात्मिक ओळखीची थट्टा सहन करणार नाही, असं या पोस्टमध्ये म्हटलंय. लड्डीने कपिलच्या मॅनेजरशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी कोणताच प्रतिसाद दिला नाही. ‘आमच्या सर्व कॉल्सकडे दुर्लक्ष करण्यात आलं’, अशीही तक्रार त्याने केली.
