Priya Marathe : ती सुटली ते बरं झालं..; मराठी अभिनेत्रीच्या निधनानंतर शिवानी सोनारकडून भावना व्यक्त
Priya Marathe : प्रिया मराठेच्या निधनानंतर अभिनेत्री शिवानी सोनारने भावना व्यक्त केल्या आहेत. प्रियाचं कॅन्सरने निधन झालं. गेल्या काही वर्षांपासून ती कॅन्सरशी झुंज देत होती. वयाच्या 38 व्या वर्षी तिने अखेरचा श्वास घेतला.

Priya Marathe : मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये दमदार भूमिका साकारून प्रेक्षकांची मनं जिंकणारी अभिनेत्री प्रिया मराठेचं काही दिवसांपूर्वी निधन झालं. वयाच्या 38 व्या वर्षी तिची कॅन्सरशी झुंज अपयशी ठरली. प्रियाच्या निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला. मराठी आणि हिंदी मालिका विश्वातील अनेक कलाकारांनी सोशल मीडियाद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्री शिवानी सोनारने प्रतिक्रिया दिली आहे. प्रियाच्या निधनानंतर सोशल मीडियावर तिच्याविषयी पोस्ट का लिहिली नाही, यामागचं कारणही तिने यावेळी सांगितलं.
‘अल्ट्रा मराठी बझ’ला दिलेल्या मुलाखतीत शिवानी म्हणाली, “प्रियाच्या निधनानंतर मी तिचा फोटो शेअर करत पोस्ट वगैरे लिहिली नव्हती किंवा स्टोरीमध्येही भावना व्यक्त केल्या नव्हत्या. कारण माझ्यात ती हिंमतच नव्हती. तिच्यासोबत जे झालं, ते सर्व पचवायलाच मला दोन दिवस लागले. आम्हाला तिच्या आजारपणाची कल्पना होती. तिचा शेवटचा शो आम्ही एकत्र केला होता. जवळपास महिना-दीड महिना मी तिच्यासोबत मेकअप रुप शेअर केली होती. काही माणसं आपल्यासोबत कायम राहतील असं वाटतं. तीसुद्धा राहील असं वाटलं होतं. तिच्या निधनानंतर संपूर्ण कलाविश्वातून अनेकांकडून भावना व्यक्त केल्या जात होत्या. तेव्हा मला तिचं मोठेपण खऱ्या अर्थाने कळलं.”
“मी पुण्यात असल्याने मला प्रियाच्या अंत्यदर्शनाला जाता आलं नव्हतं. मी, ती आणि भक्ती रत्नपारखी.. आम्ही तिघी रुम शेअर करायचो. तिच्या निधनाच्या दुसऱ्या दिवशी जेव्हा माझं आणि भक्तीचं बोलणं झालं, तेव्हा असं वाटलं की ती त्या त्रासातून सुटली ते बरं झालं. कारण शेवटी-शेवटी तिला खूप त्रास होत होता. प्रियाला एवढ्या यातना सहन कराव्या लागू नयेत, असं वाटत होतं. पण आज ती जिथे कुठे असेल, तिथे सुखी असेल. कधी कधी देव चांगल्या माणसांसोबत खूप वाईट गोष्टी करतो”, अशा शब्दांत तिने भावना व्यक्त केल्या आहेत.
2023 मध्ये प्रियाने ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेला रामराम केला होता. तिने ‘या सुखांनो या’ या मालिकेतून टेलिव्हिजनवर पदार्पण केलं होतं. त्यानंतर तिने अनेक मराठी मालिकांमध्ये दमदार भूमिका साकारल्या होत्या. ‘चार दिवस सासूचे’मध्येही ती झळकली होती. त्यानंतर ‘कसम से’ या मालिकेतून तिने हिंदी टेलिव्हिजन क्षेत्रात पाऊल ठेवलं होतं. ‘पवित्र रिश्ता’ या लोकप्रिय मालिकेत तिने वर्षाची भूमिका साकारली होती. ‘बडे अच्छे लगते है’ या गाजलेल्या मालिकेत ती ज्योती मल्होत्राच्या भूमिकेत होती. प्रिया मराठेनं 24 एप्रिल 2012 रोजी अभिनेता शंतनू मोघेशी लग्न केलं होतं.
