Siddharth Chandekar: ‘तुला सोबत घेऊन जाता येणं शक्य नाही म्हणून..’, सिद्धार्थ चांदेकरची भावूक पोस्ट

आजवर जितक्या पोस्ट्स वाचल्या इन्स्टावर त्यातली सर्वोत्कृष्ट, असं जितेंद्र जोशीने म्हटलं. याशिवाय प्रार्थना बेहरे, गायत्री दातार, लेखक क्षितिज पटवर्धन, क्षिती जोग, जुईली जोगळेकर, अक्षया गुरव, पर्ण पेठे, स्पृहा जोशी, नचिकेत लेले, आरोह वेलकरण यांनीसुद्धा कमेंट्स केल्या आहेत.

Siddharth Chandekar: 'तुला सोबत घेऊन जाता येणं शक्य नाही म्हणून..', सिद्धार्थ चांदेकरची भावूक पोस्ट
सिद्धार्थ चांदेकरची भावूक पोस्ट
Image Credit source: Instagram
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: स्वाती वेमूल

Jun 28, 2022 | 1:04 PM

घर म्हटलं की फक्त चार भिंती, खिडक्या आणि दार.. इतकंच नसतं. त्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यात घरातील प्रत्येक सदस्याच्या आठवणींची पोतडी असते. आपल्या हातांनी घरातली प्रत्येक जागा सजवल्यानंतर, त्यात असंख्य आठवणी जगल्यानंतर ते घर (Home) सोडून जाताना मात्र मन भरून येतं. म्हणायला फक्त एक राहायची जागा जरी असली तरी त्या जागेनं आपले चांगले-वाईट, यशापशाचे, सुख-दु:खाचे सर्व दिवस, सर्व क्षण पाहिलेले असतात. अभिनेता सिद्धार्थ चांदेकर (Siddharth Chandekar) आणि अभिनेत्री मिताली मयेकर (Mitali Mayekar) हे त्यांचं जुनं घर सोडून नवीन घरात राहायला जात आहेत. जुनं घर सोडताना सिद्धार्थ आणि मितालीने सोशल मीडियावर पोस्ट लिहित घराबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहेत. या पोस्टवर सर्वसामान्यांसह सेलिब्रिटींनीसुद्धा कमेंट्स केल्या आहेत.

सिद्धार्थ चांदेकरची पोस्ट-

‘तुला सोबत घेऊन जाता येणं शक्य नाही म्हणून, नाहीतर एका छोट्या पोतडीत बांधून कायमचं घेऊन गेलो असतो. किती काय काय पाहीलंयस तू. किती काय काय दाखवलंयस तू. किती लोक, किती प्रेम, किती भांडणं, किती अडचणी, किती आनंद. कित्ती कित्ती आठवणी. स्वप्नात येशील तेव्हा तुझ्याच एका कोपऱ्यात एका भिंतीला डोकं टेकवून बसेन. तुझ्या रंगावरून, फरशीवरून हात फिरवेन. मुटकुळं करून तुझ्या खिडकीशी झोपून जाईन. तेव्हापण असंच थोपट.. जसं इतकी वर्ष केलंस. तुझा वास, तुझी धूळ, मुठीत घट्ट पकडून नेतोय. ज्या नवीन घरात चाललोय त्याला तुझ्या गोष्टी सांगेन. तुझ्यासारखं मिठी मारायला शिकवेन. आमच्यानंतर जे येतील त्यांना असंच प्रेम दे. पण आम्हाला विसरू नकोस. नीट राहा. नीट राहू दे. प्रेम’, अशा शब्दांत सिद्धार्थने भावना व्यक्त केल्या आहेत.

पहा फोटो-

मिताली मयेकरची पोस्ट-

‘आज मनात कटू-गोड भावना आहे. नवीन घरात, आपल्या हक्काच्या घरात राहायला जाणं ही बाब अनेक कारणांसाठी खास आहे. परंतु, आम्ही नवीन घरात नवीन आठवणी बनवण्याच्या तयारीत असताना, आमचं हे जुनं घर मागे सोडत आहोत, ज्याने आम्हाला अविस्मरणीय आठवणी दिल्या आहेत. हे खूप कठीण आहे. आपण आपल्या हातांनी सजवलेली, बनवलेली जागा अशा पद्धतीने सोडणं खूप कठीण आहे. या घराने आमचं यश, आमचं अपयश, लॉकडाउन, आमची भांडणं, प्रेम, लग्न या सर्व गोष्टी पाहिल्या आहेत. असंख्य पार्ट्या, स्लीपओव्हर्स, काही ब्रेकअप्स आणि नव्याने बहरलेल्या प्रेमाची सुरुवात, असं सगळं काही या घराने पाहिलंय. मुंबईत निसर्गाच्या अगदी जवळ असलेलं घर. अशी जागा शोधण्याइतका नशीबवान प्रत्येकजण नसतो. इथल्या निसर्गाची मला खूप आठवण येईल. एखाद-दोनदा बिबट्याला पाहण्यापासून ते माकड्यांना खायला घालण्यापर्यंत, या घराने नेहमीच माझ्या निसर्गप्रेमी मनाला समाधानी केलंय. ही खिडकी नेहमीच माझ्या आठवणीत राहील. आठवणींबद्दल बोलायचे झाल्यास, आता आम्ही अशाच आठवणी नवीन घरात बनवणार आहोत. 5C/403.. प्रत्येक गोष्टीसाठी तुला धन्यवाद,’ अशा शब्दांत मिताली व्यक्त झाली.

पहा फोटो-

आजवर जितक्या पोस्ट्स वाचल्या इन्स्टावर त्यातली सर्वोत्कृष्ट, असं जितेंद्र जोशीने म्हटलं. तर फार सुंदर सिद्धू, नवीन घरासाठी खूप शुभेच्छा, असं अमृता खानविलकरने लिहिलं. याशिवाय प्रार्थना बेहरे, गायत्री दातार, लेखक क्षितिज पटवर्धन, क्षिती जोग, जुईली जोगळेकर, अक्षया गुरव, पर्ण पेठे, स्पृहा जोशी, नचिकेत लेले, आरोह वेलकरण यांनीसुद्धा कमेंट्स करत शुभेच्छा दिल्या आहेत. सिद्धार्थ आणि मितालीचं नवीन घर हे अभिनेत्री क्षिती जोगच्या शेजारीच आहे.

हे सुद्धा वाचा


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें