मायकल जॅक्सनचं मुंबईत स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेनं ठेवली होती ‘ही’ खास अट
मायकल जॅक्सनच्या 'हिस्ट्री वर्ल्ड टूर'मध्ये (HIStory World Tour ) विविध देशांचा समावेश होता. विविध देशांमध्ये त्याने असंख्य चाहत्यांसमोर परफॉर्म केलं होतं. त्यापैकी मुंबईतील कॉन्सर्ट हे या टूरमधील ठळक वैशिष्ट्य होतं.

जगप्रसिद्ध पॉप कलाकार, पॉप सेन्सेशन मायकल जॅक्सन 1996 मध्ये भारतात आला होता. भारतीयांसाठी हा ऐतिहासिक क्षण होता. त्यावेळी मायकल जॅक्सनचं स्वागत करण्याची मोठी संधी अभिनेत्री सोनाली बेंद्रेला मिळाली होती. ‘हिस्ट्री वर्ल्ड टूर’अंतर्गत तो भारतात आला होता. इथे त्याचं जंगी स्वागत करण्याची मुख्य भूमिका जबाबदारी सोनाली बेंद्रे आणि राज ठाकरे यांच्यावर होती. आता जवळपास तीन दशकांनंतर सोनाली त्या घटनेविषयी मोकळेपणे व्यक्त झाली आहे. एका अटीवर मी मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी तयार झाले होते, असा खुलासा सोनालीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत केला.
मायकल जॅक्सन जेव्हा एअरपोर्टवर पोहोचला, तेव्हा मराठमोळ्या पद्धतीने त्याचं स्वागत करण्यात आलं होतं. त्यावेळी सोनालीने नऊवारी साडी नेसली होती आणि त्यावर मराठमोळा साज केला होता. मायकलच्या कपाळावर टिळा लावून आणि औक्षण करून तिने त्याचं जंगी स्वागत केलं होतं. या सर्व आयोजनांच्या पडद्यामागची गोष्ट आता सोनालीने उलगडली आहे.
‘एएनआय’ला दिलेल्या मुलाखतीत सोनालीने सांगितलं की स्वागत समारंभाबाबत तिला राज ठाकरे यांची पत्नी शर्मिला ठाकरे यांनी विचारणा केली होती. “त्यांनी मला सांगितलं होतं की तुला तिथे एअरपोर्टवर येऊन ते सर्वकाही करावं लागेल आणि माझ्याशी संपर्क साधणारी व्यक्ती व्हावी लागेल. मला वाटतं की ती शर्मिला होती, राजची पत्नी. शर्मिलाची आई आणि माझी मावशी या एकमेकींच्या खूप जुन्या मैत्रिणी आहेत. ती मला म्हणाली की, तूच हे का करत नाहीस? (मायकल जॅक्सनचं स्वागत)”, असं सोनाली पुढे म्हणाली.
त्यावेळी सोनाली बॉलिवूड इंडस्ट्रीत करिअरच्या शिखरावर आणि अत्यंत लोकप्रिय होती. मायकल जॅक्सनचं मुंबई एअरपोर्टवर स्वागत करण्यासाठी तिने एक अट ठेवली होती. “मी तिला म्हटलं की ठीक आहे, पण मला त्या शोची चांगली तिकिटं पाहिजेत आणि तेसुद्धा माझ्या सर्व मित्रमैत्रिणींसह. त्यामुळे त्या शोला माझ्या मित्रमैत्रिणींसोबत जाता यावं, त्याची तिकिटं मिळावीत यासाठी मी स्वागत करायला तयार झाले होते. माझ्या बहिणी, बहिणीच्या मैत्रिणी आणि आम्हा सर्वांना त्या शोची खूप चांगली तिकिटं मिळाली होती. चांगल्या जागेवरून आम्हाला मायकल जॅक्सनचा शो बघता आला होता. म्हणूनच मी त्या कार्यक्रमाविषयी खूप उत्सुक होते”, असं सोनालीने सांगितलं.
