तिथे गोंधळ असेल तर कशातच आनंद मिळत नाही..; सुबोध भावेच्या मताने जिंकली नेटकऱ्यांची मनं
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेता सुबोध भावे त्याच्या काम करण्याच्या पद्धतीवर मोकळेपणे व्यक्त झाला. काही गोष्टी पैशांसाठी कराव्या लागतात, असं स्पष्ट मत त्याने मांडलंय. सुबोधची ही मुलाखत सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.

कलाविश्वात काम करताना काही प्रोजेक्ट आपल्या आवडीचे नसले तरी काही कलाकारांना ते करावे लागतात. कारण त्यातून मिळणारं मानधन महत्त्वाचं असतं. तर काही प्रोजेक्टमध्ये पैसे फार मिळत नसले तरी कामाचं समाधान मात्र मिळतं. अभिनेता सुबोध भावेनं याचसंदर्भात त्याचं मत मांडलंय. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सुबोध याविषयी मोकळेपणे व्यक्त झाला. त्याच्या या मताने नेटकऱ्यांची आणि कलाकारांचीही मतं जिंकली आहेत.
काय म्हणाला सुबोध?
“मला असं वाटतं की विचारांची स्पष्टता ज्या क्षणी आयुष्यात येते ना, त्या क्षणी आयुष्य फार सुंदर व्हायला लागतं. तिथे गोंधळ असेल ना, तर मग कशातच आनंद मिळत नाही. मी कायम म्हणतो, तुम्ही ना कलाकार म्हणून आलात ना, मग एका गोष्टीचा आनंद तुम्हाला मिळालाच पाहिजे. म्हणजे काही काही गोष्टी तुम्हाला पैशांसाठी कराव्या लागतात, तर करायला लागतात. याच्यात तुम्हाला कमीपणा वाटण्यासारखा काही नाहीये. आणि काही काही गोष्टी कलाकाराच्या समाधानासाठी करायला लागतात. मग त्याच्यात कदाचित पैशांचं समाधान नाही मिळणार. पण यापैकी कुठलंतरी एक समाधान तुला मिळालं पाहिजे. या दोन्ही नाही मिळाल्या, मग ते काम नको करूस,” असं तो म्हणाला.
View this post on Instagram
“मग हा रोल यथातथा असू देत, पिक्चर यथातथा असू देत, पण पैसे उत्तम आहेत. त्याने तुझं घर सहा महिने चालणार आहे? कर. मग तू सेटवर गेल्यावर स्वच्छ असतोस. किंवा पैसे नाहीयेत, पण रोल मजा येणारी असेल. मग ते पैसे बघू नकोस. कारण ते तुला पुढचं अनंत काम करण्याची ऊर्जा देणार आहे. ती महत्त्वाची आहे. त्यामुळे ही स्पष्टता पाहिजे,” असं मत त्याने मांडलंय. या व्हिडीओवर अभिजीत खांडकेकरनेही टाळ्या वाजवतानाचा इमोजी पोस्ट केला आहे. सुबोध सध्या ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘वीण दोघांतली ही तुटेना’ या मालिकेत काम करतोय. यामध्ये त्याच्यासोबत अभिनेत्री तेजश्री प्रधान झळकतेय. ऑगस्ट महिन्यापासून ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
