अंगात देवी आल्याच्या व्हिडीओवरून ट्रोल करणाऱ्यांना सुधा चंद्रन स्पष्टच म्हणाल्या, “माझ्या अपघातानंतर..”
अभिनेत्री सुधा चंद्रन यांच्या अंगात देवी आल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यावर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या होत्या. काहींनी त्यांना ट्रोलसुद्धा केलं होतं. या ट्रोलिंगवर आता सुधा यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

अभिनेत्री आणि डान्सर सुधा चंद्रन यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. एका पूजेदरम्यानचा हा व्हिडीओ असून त्यामध्ये सुधा यांच्या अंगात देवी आल्याचं पहायला मिळालं. या व्हिडीओवरून काहींनी त्यांना ट्रोलसुद्धा केलंय. आता या ट्रोलिंगवर आणि व्हायरल व्हिडीओवर सुधा चंद्रन यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. मला कोणालाही काहीही स्पष्टीकरण देण्याची गरज वाटत नाही आणि भक्तीमुळेच मी अशा प्रकारे प्रेरित झाली होती, असं त्यांनी स्पष्ट केलं. त्या क्षणी देवीचा आशीर्वाद मिळाल्याची भावना जाणवल्याने व्हिडीओ व्हायरल झाल्याचा मी फार विचार करत नाही, असंही त्यांनी म्हटलंय.
‘टाइम्स नाऊ’ला दिलेल्या मुलाखतीत त्या म्हणाल्या, “तो एक असा क्षण होता, जो प्रत्येकजण जगू पाहतो. देवी शक्ती तुमच्यात येऊन तुम्हाला ती ऊर्जा देते. देवीचा आशीर्वाद खूप कमी लोकांना मिळतो आणि मी त्यापैकी एक होते. माझ्या माध्यमातून लोकांना आशीर्वाद मिळत असेल तर माझ्या आयुष्यातील हा सर्वांत आनंदी क्षण आहे. मी इथे स्पष्टीकरण देण्यासाठी आले नाही. आयुष्याकडे पाहण्याचा माझा स्वतंत्र दृष्टीकोन आहे. माझे काही असे कनेक्शन्स आहेत, ज्यांचा मी आदर करते. मला लोकांशी काहीच घेणं-देणं नाही. जी लोकं ट्रोल करत आहेत, ते त्यांच्या आयुष्यात खुश राहूदेत. पण त्या लाखो लोकांबद्दल काय, जे याच्याशी जोडले जाऊ शकले आणि ज्यांना ते आपलंसं वाटलं? माझ्यासाठी ती लोकं महत्त्वाची आहेत.”
View this post on Instagram
यावेळी सुधा चंद्रन यांनी त्यांच्या आयुष्यातील सर्वांत भयंकर अपघाताच्या आठवणींना उजाळा दिला. “लोक काय म्हणतील, याचा विचार मी कधीच माझ्या आयुष्यात केला नाही. माझ्या अपघातानंतरही लोकांनी म्हटलं होतं की काय मूर्खपणा करतेस तू? पण जेव्हा तीच यशोगाथा बनते, तेव्हा लोक त्याच्याबद्दल चर्चा करतात. माझ्या मते, भक्ती हा खूप वैयक्तिक विषय आहे. मी कोणाच्याच भक्तीबद्दल मतं बनवत नाही किंवा टीका करत नाही. मी कोणाच्याही प्रश्नांची उत्तरं देण्यास किंवा ट्रोलिंगला प्रत्युत्तर देण्यास बांधिल नाही. मी स्वबळावर यशस्वी झालेली महिला आहे आणि यापुढेही माझं आयुष्य अशाच पद्धतीने अत्यंत आदरपूर्वक जगेन”, असं त्या पुढे म्हणाल्या.
