बँक अकाऊंटमधून सर्व पैसे गायब..; करिश्मा कपूरच्या मुलांचा खळबळजनक दावा, नेमकं काय आहे प्रकरण?
दिवंगत वडील संजय कपूर यांच्या मृत्यूपत्राबाबत योग्य माहिती मिळावी यासाठी अभिनेत्री करिश्मा कपूरच्या मुलांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. याप्रकरणी गुरुवारी सुनावणीदरम्यान करिश्माच्या मुलांच्या वकिलांनी कोर्टात मोठा दावा केला.

अभिनेत्री करिश्मा कपूरचा पूर्व पती आणि बिझनेसमन संजय कपूरच्या निधनानंतर त्याच्या कथित 30 हजार कोटी रुपयांच्या संपत्तीवरून वाद सुरू आहे. गुरुवारी याप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी संजयची पत्नी प्रिया सचदेवने संपत्तीबाबतची माहिती उघड न करण्याची मागणी न्यायाधीशांसमोर केली. त्याला कोर्टाने साफ नकार दिला. तर दुसरीकडे करिश्मा कपूरच्या वकिलांनी असा दावा केला की संजयच्या मृत्यूपत्रात ज्या पैशांचा उल्लेख केला होता, ते पैसे बँक अकाऊंटमधून गायब झाले आहेत.
‘एनडीटीव्ही’ने दिलेल्या वृत्तानुसार, जस्टिस ज्योती सिंह यांनी प्रियाच्या वकिलांना सवाल केला, “ही माहिती किती काळ सीलबंद ठेवणार? न्यायालयीन प्रक्रियेला काही मर्यादा आहेत. मी असा आदेश कसा देऊ शकतो?” त्यावर प्रियाने न्यायाधीशांना सांगितलं की तिला काहीही लपवायचं नाही. परंतु करिश्मा कपूरने नॉन-डिस्क्लोजर करारावर (एनडीए) स्वाक्षरी करावी अशी तिची इच्छा आहे.
संजय कपूरची तिसरी पत्नी प्रिया सचदेव कपूरने दिल्ली उच्च न्यायालयात एक अर्ज दाखल करत पतीच्या वैयक्तिक मालमत्तेची माहिती उघड करू नये अशी विनंती केली आहे. यासंदर्भात तिने नॉन-डिस्क्लोजर कराराची विनंती केली आहे. करिश्मा कपूरची मुलं आणि सासू राणी कपूर यांनी सायबर सुरक्षा आणि अशा इतर सुरक्षेच्या समस्या लक्षात घेऊन नॉन-डिस्क्लोजर करारावर स्वाक्षरी करावी, असं प्रियाने तिच्या अर्जात म्हटलंय. कोर्टाने प्रियाला संजयच्या सर्व जंगम आणि स्थावर मालमत्तेची माहिती उघड करण्याचे निर्देश दिले होते. सुनावणीदरम्यान प्रियाने सांगितलं की ती करिश्माच्या मुलांना संजयच्या वैयक्तिक मालमत्तेची माहिती देण्यास कचरत नाही, परंतु त्यांनी एनडीएवर स्वाक्षरी करावी. या मागणीला करिश्माच्या मुलांच्या वकिलांनी विरोध केला आहे.
या सुनावणीदरम्यान करिश्माच्या मुलांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या वकिलांनी असा दावा केला की संजयच्या कथित मृत्यूपत्रात उल्लेख केलेले पैसे बँक खात्यातून गायब झाले आहेत. याप्रकरणाची सुनावणी शुक्रवारपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. करिश्माच्या मुलांकडून दिल्ली उच्च न्यायालयात प्रियाविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. प्रियाने संजयच्या मृत्यूपत्राची माहिती लपवून ठेवल्याचा आरोप या याचिकेतून करण्यात आला आहे.
