Sunjay Kapur Property: मी विधवा, तू पतीला सोडून दिलेलंस; तिने करिश्माला कोर्टात घेरलं, संजय कपूरच्या प्रॉपर्टीचा वाद वाढला
Sunjay Kapur Property: अभिनेत्री करिश्मा कपूरच्या दोन्ही मुलांनी त्यांच्या वडिलांच्या संपत्तीत वाटा मिळावा यासाठी कोर्टात धाव घेतली आहे. त्यांनी सावत्र आई आणि संजय कपूरची तिसरी पत्नी प्रिया सचदेव कपूर हिच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

Sunjay Kapur Property: अभिनेत्री करिश्मा कपूरचा पूर्व पती आणि बिझनेसमन संजय कपूरचं जून महिन्यात लंडनमध्ये पोलो खेळताना निधन झालं. निधनानंतर त्याच्या 30 हजार कोटींच्या संपत्तीवरून कुटुंबात वाद सुरू आहेत. संपत्तीचा हा वाद आता दिल्ली उच्च न्यायालयात पोहोचला आहे. कारण करिश्माच्या दोन्ही मुलांनी वडिलांच्या संपत्तीत वाटा मिळावा यासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. संजयची तिसरी पत्नी प्रिया सचदेव कपूर हिने संपूर्ण संपत्ती मिळवण्यासाठी मृत्यूपत्रात छेडछाड केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. याप्रकरणी बुधवारी कोर्टात सुनावणी झाली. न्यायालयाने प्रिया कपूरला संजयच्या संपूर्ण संपत्तीची माहिती देण्याचे आदेश दिले आहेत. याप्रकरणाची पुढील सुनावणी 9 ऑक्टोबर रोजी होणार आहे.
प्रिया कपूरच्या वतीने तिच्या वकिलांनी न्यायालयात युक्तीवाद केला की, “संजयच्या मृत्यूच्या वेळी ती त्यांचे कायदेशीर पत्नी होती. आता प्रेम आणि जवळीकीचा दावा केला जातोय. या सर्व गोष्टी तेव्हा कुठे होत्या, जेव्हा तिने (करिश्माने) घटस्फोटासाठी सर्वोच्च न्यायालयापर्यंत मोठी कायदेशीर लढाई लढली होती. संजय कपूरने एक ट्रस्ट स्थापन केला होता. खटला दाखल होण्याच्या पाच दिवस आधी ट्रस्टच्या कागदपत्रांनुसार 1900 कोटी रुपयांची मालमत्ता मुलांना हस्तांतरित करण्यात आली होती.”
“मी विधवा आहे. मी त्याची शेवटची कायदेशीर पत्नी होती. तेव्हा तू कुठे होतीस? तुझा पती तुला अनेक वर्षांपूर्वीच सोडून गेला होता”, असा सवाल प्रियाच्या वतीने करिश्माला कोर्टात करण्यात आला होता. तेव्हा करिश्माच्या वतीने उपस्थित असलेल्या वकिलाने संजय कपूरच्या मृत्यूनंतर घडलेल्या घटनांकडे न्यायालयाचं लक्ष वेधलं. ते म्हणाले, “करिश्माला आधी प्रिया कपूरने सांगितलं होतं की कोणतंही मृत्यूपत्र नाही. काही मालमत्ता ट्रस्टकडे जमा केलेली आहे. त्यानंतर काही काळानंतर करिश्मा आणि प्रिया यांच्यात बैठका झाल्या, चर्चा झाल्या. त्यातून ट्रस्टच्या तरतुदींवर चर्चा करण्यासाठी दिल्लीत एक मिटींग केली जावी, असा निर्णय घेण्यात आला.”
एएनआयच्या वृत्तानुसार, करिश्मा कपूर सध्या तिच्या मुलांची कायदेशीर पालक म्हणून उच्च न्यायालयात खटला चालवतेय. वडील संजय कपूर यांच्या 30 हजार कोटींच्या मालमत्तेचं योग्य विभाजन आणि मालमत्तेचा योग्य हिशोब देण्याची मागणी मुलांनी न्यायालयाकडे केली आहे. आम्हाला आमच्या वडिलांच्या मालमत्तेबद्दल संपूर्ण माहिती देण्यात आली नव्हती आणि अनेक गोष्टी जाणूनबुजून लपवण्यात आल्या होत्या, असा दावा मुलांनी केला आहे.
