Sunjay Kapur Property: 15 वर्षे कुठेच नव्हतीस..; पूर्व पतीच्या संपत्तीच्या वादावरून करिश्माला वकिलाने सुनावलं
Sunjay Kapur Property: अभिनेत्री करिश्मा कपूरच्या दोन्ही मुलांनी दिल्ली हायकोर्टात धाव घेतली आहे. वडिलांच्या संपत्तीत वाटा मिळावा यासाठी त्यांनी याचिका दाखल केली आहे. संजय कपूरची तिसरी पत्नी प्रियाने मृत्यूपत्राशी छेडछाड केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

Sunjay Kapur Property: अभिनेत्री करिश्मा कपूरच्या दोन्ही मुलांनी त्यांचे दिवंगत वडील संजय कपूरच्या संपत्तीत वाटा मिळावा यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली. करिश्माच्या मुलांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयाने बुधवारी नोटीस बजावली आहे. आमच्या वडिलांची संपत्ती हडपण्यासाठी त्यांची पत्नी प्रिया कपूर यांनी बनावट मृत्यूपत्र सादर केल्याचा आरोप त्यांनी याचिकेत केला आहे. प्रिया ही संजयची तिसरी पत्नी आहे. या याचिकेवरून आता प्रियाला संजयच्या सर्व जंगम आणि स्थावर मालमत्तेची यादी सादर करण्याचे आदेश दिले आहेत. संजय कपूरच्या निधनानंतर त्याच्या 30 हजार कोटींच्या संपत्तीवरून सध्या वाद सुरू आहे. याचिकेवरील सुनावणीदरम्यान प्रिया कपूरचे वकील राजीव नायर यांनी करिश्मा कपूरवर निशाणा साधला.
संजय कपूरपासून विभक्त झाल्यानंतर करिश्मा गेल्या 15 वर्षांपासून कुठेही दिसत नव्हती, असं प्रियाचे वकील म्हणाले. संजयच्या संपूर्ण संपत्तीबाबत आता न्यायालयाने दोन आठवड्यांच्या आत लेखी निवेदन दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानंतर एक आठवड्याच्या आत उत्तर द्यावं असं म्हटलंय. वडिलांच्या मालमत्तेत वाटा मिळावा यासाठी करिश्मा कपूरच्या दोन्ही मुलांची दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. करिश्मा कपूर आणि संजय कपूरचं लग्न 2003 मध्ये झालं होतं. त्यानंतर 2016 मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. या दोघांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलांनी दाखल केलेल्या याचिकेवर 9 ऑक्टोबर रोजी पुन्हा सुनावणी होईल.
सुनावणीदरम्यान न्यायालयाकडून प्रिया कपूरला मृत्यूपत्राबाबत सवाल करण्यात आला. करिश्माच्या मुलांना मृत्यूपत्राची प्रत देण्यास ती का टाळाटाळ करतेय, असा प्रश्न प्रियाला करण्यात आला. जूनमध्ये वडील संजय कपूर यांचं निधन झाल्यानंतर प्रियाने आम्हाला त्यांच्या संपत्तीतून चुकीच्या पद्धतीने वगळलं आहे, असा आरोप करिश्माच्या मुलांकडून याचिकेत करण्यात आला आहे. या खटल्यात प्रिया कपूर, तिचा अल्पवयीन मुलगा, संजयची आई राणी कपूर आणि मृत्यूपत्राची अंमलबजावणी करणारी श्रद्धा सुरू मारवाह यांची नावं प्रतिवादी म्हणून आहेत.
करिश्माच्या मुलांनी असा दावा केला आहे की प्रिया कपूरने दिनेश अग्रवाल आणि नितीन शर्मा या दोन साथीदारांसोबत मिळून सात आठवड्यांपेक्षा जास्त काळ मृत्यूपत्र दाबण्याचा कट रचला. त्यानंतर 30 जुलै रोजी कौटुंबिक बैठकीत ते उघड केलं. प्रियाचं हे वर्तन इतर कायदेशीर वारसांना वगळून संजय कपूरच्या मालमत्तेवर संपूर्ण नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न असल्याचं दिसतंय, असंही या खटल्यात म्हटलंय.
